चंद्रपूर – (Ramnagar Arms Act) प्रकरणात चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत बाबुपेठ येथील एका घरातून बेकायदेशीरपणे लपवून ठेवलेली धारदार तलवार जप्त केली आहे. पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाला अटक करून भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे. (हे हि वाचा – बाजारात सत्तूर घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न)
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन करणारी एक मोठी कारवाई समोर आली असून, बाबुपेठ वॉर्डात राहत्या घराच्या अंगणात बेकायदेशीरपणे घातक तलवार लपवून ठेवणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. विवेक चंद्रहास लिपटे (वय २५ वर्षे, रा. जुनोना चौक, बाबुपेठ वॉर्ड, चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ३० जून २०२६ रोजी करण्यात आली.
Ramnagar Arms Act अंतर्गत रामनगर पोलिसांची मोठी कारवाई
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश रामचंद्र बलकी हे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस हवालदार रामप्रसाद नैताम, आनंद खरात आणि पोलीस अंमलदार सुरेश कोरवार यांच्यासह हद्दीत आर्म ॲक्ट, अवैध दारू व जुगार छाप्यांच्या अनुषंगाने गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना एका मुखबिराकडून खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की, जुनोना चौक परिसरातील विवेक लिपटे हा तरुण त्याच्या राहत्या घरी बेकायदेशीरपणे घातक शस्त्र बाळगून आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी जुनोना चौक येथे दोन पंचांना बोलावून कारवाईबाबत कायदेशीर सूचना दिली आणि तात्काळ विवेक लिपटे याच्या घरावर छापा टाकला. घरात एक तरुण मिळून आला असता पंचांसमक्ष त्याचे नाव विचारले असता त्याने विवेक चंद्रहास लिपटे असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घराची आणि परिसराची कसून झडती घेण्यास सुरुवात केली असता, घराच्या अंगणात असलेल्या बाथरूमला लागून ठेवलेल्या लाकडी काड्यांच्या ढिगाऱ्यामध्ये लपवून ठेवलेली एक लोखंडी टोकदार व धारदार तलवार पोलिसांच्या हाती लागली.
जप्त करण्यात आलेली तलवार स्टीलची मूठ असलेली असून तिची मुठीसहित एकूण लांबी ३२ इंच, पात्याची लांबी २४ इंच, पात्याची रुंदी १ इंच आणि मुठीची लांबी ८ इंच अशी आहे, ज्याची अंदाजे किंमत ५०० रुपये आहे. आरोपीने जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन करून हे घातक हत्यार विनापरवाना घरात लपवून ठेवल्यामुळे पोलिसांनी सदर तलवार पंचांसमक्ष सीलबंद करून जप्त केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बलकी यांच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात रात्री २२:५१ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला असून, ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभावती त्र्यंबक एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा प्रल्हाद दराडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






