Sindewahi Bridge Accident पळसगाव जाट नदी पुलावर एसटी बस आणि ट्रकची भीषण धडक

एसटी बस-गिट्टी ट्रकची भीषण धडक; ३० ते ३५ प्रवासी जखमी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 2, 2026

सिंदेवाही (चंद्रपूर) : (Sindewahi Bridge Accident) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट नदी पुलावर पुन्हा एक भीषण अपघात झाला. एसटी महामंडळाच्या जलद बसची आणि गिट्टीने भरलेल्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत सुमारे ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अवघ्या दोन दिवसांत याच पुलावरील हा दुसरा मोठा अपघात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. धोकादायक वळणांमुळे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. (हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू)

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट नदी पुलावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, आज, २ जुलै २०२६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास येथे पुन्हा एक भीषण अपघात घडला. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच याच पुलावर झालेल्या एका अपघातात एका निष्पाप युवकाला आपला जीव गमवावा लागला होता, आणि ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा झालेल्या या मोठ्या अपघातामुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.

Sindewahi Bridge Accident : पळसगाव जाट पुलावर नेमके काय घडले?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजुरा येथून भंडाऱ्याच्या दिशेने सिंदेवाही मार्गे जात असलेल्या एसटी महामंडळाच्या एका जलद (फास्ट) बसची आणि नागपूरकडून सिंदेवाहीकडे येत असलेल्या गिट्टीने भरलेल्या ट्रकची पळसगाव जाट नदी पुलावर समोरासमोर प्रचंड जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेच्या आवाजाने परिसर हादरला आणि बसमधील प्रवाशांमध्ये एकच आक्रोश व आरडाओरडा सुरू झाला. या ढडकेत एसटी बसमधील सुमारे ३० ते ३५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील अनेक प्रवाशांना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापती झाल्या असून, सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत. अपघाताच्या भीषणतेमुळे पुलाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आणि बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले. रुग्णवाहिका, पिकअप गाड्या आणि जे वाहन उपलब्ध होईल, त्याच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. यानंतर पोलिसांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, पळसगाव जाट नदी पुलाच्या दोन्ही बाजूंना अतिशय धोकादायक आणि तीव्र वळण असल्यामुळे हा पूल अपघातांचे मुख्य केंद्र बनला आहे. अवघ्या दोन दिवसांत याच ठिकाणी हा दुसरा मोठा अपघात घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कंत्राटदार आणि प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. नागभीड ते सिंदेवाही शिवाजी चौकपर्यंतच्या या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुढील दहा वर्षांसाठी ‘HAM-144’ पॅकेजअंतर्गत एका खाजगी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आली आहे.

मात्र, वारंवार येथे जीवघेणे अपघात होत असतानाही संबंधित कंत्राटदाराकडून कोणतीही सुरक्षात्मक पावले उचलली गेली नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या धोकादायक पुलावर तातडीने स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर, रम्बल स्ट्रिप्स आणि स्पष्ट दिसणारे इशारा फलक लावण्यात यावेत, अशी आग्रही मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment