चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातून (Chandrapur Babupeth Kidnapping Case) एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्युशनवरून घरी परतत असलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. (बाळविक्री प्रकरणातील संशयित आरोपीना जामीन मंजूर)
Chandrapur Babupeth Kidnapping Case : काय आहे संपूर्ण घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूपेठ येथील रहिवासी यांनी ७ जुलै रोजी पहाटे चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारदारांची १५ वर्षीय मुलगी ही ६ जुलै रोजी सकाळी शाळेत गेल्यानंतर दुपारी घरी परतली होती. त्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बाबूपेठ येथील लिटमस अकॅडमीमध्ये ट्युशनसाठी गेली. नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी ट्युशन शिक्षकांशी संपर्क साधला असता, ट्युशन सायंकाळी ६ वाजताच सुटली असून संबंधित मुलगी घरी जाण्यासाठी निघाल्याची माहिती मिळाली.
यानंतर कुटुंबीयांनी बाबूपेठ परिसरासह नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून न आल्याने अखेर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
बेपत्ता मुलीचे वर्णनही तक्रारीत देण्यात आले आहे. तिचे वय १५ वर्षे असून चेहरा गोल, वर्ण सावळा, बांधा सडपातळ, केस बॉयकट आहेत. बेपत्ता होताना तिच्या अंगात काळ्या रंगाची जीन्स आणि सिमेंट रंगाचा टी-शर्ट होता, अशी माहिती तक्रारदारांनी पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ७४८/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग दत्तात्रय हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






