Chandrapur Theft Case Inter State Burglar Arrested By LCB Police

४७ घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोराची अजब पद्धत पाहा; चंद्रपूर गुन्हे शाखेने आवळल्या अट्टल चोराच्या मुसक्या

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 10, 2026

चंद्रपूर: (Chandrapur Theft Case) मध्ये स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. रेल्वेने विनातिकीट प्रवास करून बंद घरे लक्ष्य करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका आंतरराज्यीय सराईत घरफोडी बहाद्दराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

रेल्वेने विनातिकीट प्रवास करायचा, स्टेशन परिसरातून दुचाकी चोरायची, त्या दुचाकीने फिरून बंद घरे लक्ष्य करायची आणि चोरी करून ती दुचाकी रेल्वे स्टेशनवरच सोडून पुन्हा रेल्वेने पसार व्हायचे, अशा अजब आणि अत्यंत चाणाक्ष ‘मोडस ऑपरेन्डी’चा वापर करून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरराज्यीय सराईत घरफोडी बहाद्दराला जेरबंद करण्यात चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) अत्यंत मोठे यश आले आहे.

Chandrapur Theft Case: रेल्वेने विनातिकीट प्रवास करणारा हायटेक चोर पोलिसांच्या ताब्यात

अटक करण्यात आलेल्या या आंतरराज्यीय चोराकडून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, रामनगर आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणारे तब्बल ९ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, यात घरफोडीच्या ६ आणि मोटार सायकल चोरीच्या ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस पथकाने आरोपीकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तीन दुचाकी असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमुळे विदर्भातील घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे. (३ वर्षांपूर्वी घरून निघून गेली, गुन्हे शाखेने शोधलंच)

या खळबळजनक कारवाईची सविस्तर माहिती अशी की, बल्लारपूर येथील गोरक्षण वार्डात राहणाऱ्या ३९ वर्षीय राजिता परमेश्वर सिंघाराव या १९ मे २०२६ रोजी नेहमीप्रमाणे आपल्या घराला कुलूप लावून कामावर गेल्या होत्या. भरदिवसा दुपारी दीड ते सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि अलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रकमेसह एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घरफोडीच्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपास चक्र फिरवून आरोपीचा शोध घेण्याचे कडक निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांकेडवार, सायबर सेलचे सपोनि बलराम झाडोकार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांना संशयित आरोपी हा आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम (राजमुंद्री) येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट आंध्र प्रदेश गाठून मोठ्या शिताफीने चिन्नाबाबु व्यंकटेशवरलु गोरेला (वय ३२ वर्षे, रा. देवी चौक, राजमहेंद्रवरम, ईस्ट गोदावरी, आंध्र प्रदेश) याला ताब्यात घेतले. या कारवाईत तेलंगणा पोलिसांचे अंमलदार नरेश दत्त यांनी आरोपीची अचूक ओळख पटवण्यात चंद्रपूर पोलिसांना मोलाची मदत केली. आरोपी चिन्नाबाबु हा साधासुधा चोर नसून त्याच्यावर एकट्या आंध्र प्रदेशातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत ४१ घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर तेलंगणा राज्यातही त्याच्यावर ६ गुन्हे नोंद आहेत, म्हणजेच त्याच्या गुन्हेगारीचा पूर्वइतिहास तब्बल ४७ गुन्ह्यांचा आहे.

या आंतरराज्यीय गुन्हेगाराची चोरी करण्याची पद्धत पोलिसांनाही चक्रावून टाकणारी होती. तो आपल्या डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क आणि पाठीवर कॉलेज बॅग अडकवून रेल्वेने विनातिकीट प्रवास करायचा. रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर तो सर्वात आधी तिथल्या पार्किंग किंवा परिसरातून एखादी दुचाकी चोरायचा. त्याच चोरीच्या दुचाकीने आजूबाजूच्या शहरात आणि परिसरात फिरून बंद घरांची रेकी करायचा आणि घरफोडी करून दागिने लंपास करायचा. चोरी आटोपल्यानंतर तो ती दुचाकी पुन्हा रेल्वे स्टेशन परिसरात बेवारस सोडून द्यायचा आणि मुकाट्याने रेल्वे पकडून आपल्या मूळ गावी निघून जायचा.

चंद्रपूर पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची हिरो होंडा पॅशन प्रो (MH-34 BM-5130), ३० हजार रुपयांची स्प्लेंडर (MH-34 BE-9959) आणि ५० हजार रुपयांची डेस्टीनी मोपेड (MH-34 CC-3275) अशा तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. याशिवाय त्याने चोरलेले ३ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील एका गोल्ड फायनान्स कंपनीत विकल्याचे समोर आले असून, ते दागिने हस्तगत करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे, तसेच २५ हजार रुपयांचे चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या या सराईत चोराने बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन, राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार, चंद्रपूर शहर आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक अशा एकूण ९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, बल्लारपूरचे ठाणेदार बिपीन इंगळे, सपोनि दीपक कांकेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, तसेच अंमलदार स्वामीदास चालेकर, किशोर वैरागडे, अजय बागेसर, शरद कुडे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, वृषभ बारसिंगे, विकास जुमनाके आणि वैभव गाडगे यांनी केली आहे. सध्या आरोपीला पुढील तपासासाठी बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याच्याकडून विदर्भ आणि महाराष्ट्रातील आणखी अनेक मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची दाट शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment