Chandrapur Labour Accident in Ramagundam Telangana

तेलंगणात भीषण अपघात, चंद्रपूरचे ४ मजूर ठार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 10, 2026

तेलंगणा – (Chandrapur Labour Accident) मुळे संपूर्ण विदर्भावर शोककळा पसरली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मजुरांवर काळाने भीषण घाला घातला आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात मजुरीसाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरांवर काळाने भीषण घाला घातला आहे. सिंदेवाही तालुक्यातील पवना चक गावातील मजुरांच्या वाहनाला तेलंगणातील रामगुंडम येथे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २७ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. (गडचांदूर पोलिसांवर भाजप नगरसेवकाचा गंभीर आरोप)

Chandrapur Labour Accident: रामगुंडम येथे मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील पवना चक गावातील अनेक मजूर दरवर्षीप्रमाणे यंदाही भात रोवणीच्या हंगामी कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. बुधवारी (दि. ९ जुलै) सायंकाळी सुमारे साडेसहा वाजताच्या सुमारास दिवसभर शेतात काम करून हे सर्व मजूर आपल्या राहत्या ठिकाणी परत जात असताना रामगुंडम परिसरात त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक मजूर गंभीर जखमी झाले.

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अतुल वासुदेव सोनुले (वय ४५), अर्चना जनार्धन सोनुले (वय ४०), प्रभा सिताराम मोहुर्ले (वय ५६) आणि रंजना प्रभाकर शेंडे (वय ५०) यांचा समावेश आहे. सुरुवातीला एका मृत महिलेची ओळख पटलेली नव्हती; मात्र नंतर तिची ओळख रंजना प्रभाकर शेंडे अशी निश्चित करण्यात आली.

अपघातात जखमी झालेल्या २७ मजुरांना तातडीने स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने रामगुंडम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कुटुंबे शेतीच्या हंगामी कामांवर आपला उदरनिर्वाह अवलंबून ठेवतात. स्थानिक पातळीवर पुरेसा रोजगार उपलब्ध नसल्याने दरवर्षी शेकडो मजूर भात रोवणी, कापणी आणि इतर शेतीकामांसाठी तेलंगणा राज्यात स्थलांतर करतात. मात्र, उदरनिर्वाहासाठी गेलेल्या या मजुरांवर ओढवलेल्या या भीषण दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हिरावून घेतला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांमध्ये एकच आक्रोश पसरला असून, स्थानिक प्रशासनाकडून मृतदेह गावाकडे आणण्याची आणि जखमींना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment