चंद्रपूर: Brahmapuri Crime News समोर आली असून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या चांदगाव येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तहसीलदारांकडे तक्रार का केली, याच जुन्या रागातून ६ जणांच्या टोळक्याने एका दाम्पत्याच्या घरात घुसून कुऱ्हाड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (चंद्रपुरात शस्त्रांसह दहशत माजविणाऱ्याला शहर पोलिसांनी केली अटक)
Brahmapuri Crime News : चांदगाव येथील संपूर्ण घटनाक्रम
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चांदगाव येथील रहिवासी २९ वर्षीय महिला योगेश्वरी विलास आंबोने या आपल्या पती आणि दोन लहान मुलांसह राहून मजुरीचे काम करतात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहणारा ट्रॅक्टर चालक राहुल कुळसिंगे याला दारूचे व्यसन आहे. १५ जुलैच्या सायंकाळी आरोपी राहुल कुळसिंगे हा दारूच्या नशेत धुंद होऊन आपल्या भावासह फिर्यादी महिलेच्या घरासमोर आला. यावेळी राहुलच्या हातात कुऱ्हाड आणि त्याचा भाऊ प्रवीण याच्या हातात धारदार चाकू सारखी वस्तू होती. ‘तुम्ही आमची रिपोर्ट तहसीलदारांकडे का दिली?’ असा जाब विचारत दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळातच त्यांच्या मदतीला गावातीलच बाजीराव कुळसिंगे, राजेश्वर कुळसिंगे, काशीराम कुळसिंगे आणि गिरीधर भानारकर यांच्यासह काही महिला तेथे जमल्या.
या सर्वांनी मिळून फिर्यादीच्या कुटुंबीयांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेले. ‘तू मला कुठेही भेट, तुला मारल्याशिवाय राहणार नाही’ अशी धमकी देत आरोपी राजेश्वर कुळसिंगे याने फिर्यादीच्या पतीचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी योगेश्वरी मध्यस्थी करायला गेल्या असता आरोपींनी त्यांनाही ढकलून दिले व ‘तुझ्या खानदानाला खतम करतो’ अशी थेट धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी पाहिला आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या भयानक घटनेमुळे फिर्यादी आणि त्यांचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आले आहे.
या हल्ल्याप्रकरणी पीडित महिला योगेश्वरी आंबोने यांनी तात्काळ ब्रम्हपुरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुल सुखदेव कुळसिंगे, प्रवीण प्रकाश कुळसिंगे, बाजीराव श्रीराम कुळसिंगे, राजेश्वर श्रीराम कुळसिंगे, काशीराम श्रीराम कुळसिंगे आणि गिरीधर रतीराम भानारकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १८९(१), १८९(२), १८९(४), १९०, ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद गोविंदराव बनबाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेखालाल भैय्यालाल गौतम या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






