Chandrapur Human Trafficking | चंद्रपुरात आईच बनली आरोपी, संतापजनक घटना

Chandrapur Human Trafficking : चंद्रपूर : पैशांच्या हव्यासापोटी पोटच्या गोळ्यांचा सौदा करणाऱ्या एका कसाई मातेचा थरारक आणि माणुसकीला काळीमा फासणारा कारनामा चंद्रपुरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या दोन निष्पाप मुलांची अवघ्या दोन लाखांत विक्री केल्यानंतर, या निर्दयी महिलेने आपल्याच १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा घाट घातला होता. मात्र, रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा भयानक डाव उधळला गेला असून, या आंतरराज्यीय मानवी तस्करीच्या मोठ्या रॅकेटचे ‘बिंग’ फुटले आहे. (घरात घुसून विवाहितेचा गळा चिरला)

या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून रामनगर पोलिसांनी आरोपी आईसह, बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. तर या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि नराधम प्रियकर अजय फुलझेले सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या चौघांवरही ‘अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग’ (मानवी तस्करी) व पॉक्सो अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Chandrapur Human Trafficking प्रकरणात मोठा खुलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिची ओळख अजय फुलझेले याच्याशी झाली आणि दोघेही आपल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र, काही दिवसांतच नराधम अजयची नजर त्या अल्पवयीन मुलीवर पडली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान ती मुलगी गरोदर राहिल्याचे समजताच चंद्रपुरात वाच्यता होईल या भीतीने अजय आणि तिच्या निर्दयी आईने तिला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.

तिथे रुग्णालय प्रशासनाला संशय येऊ नये म्हणून “पूर परिस्थितीमध्ये आमची सर्व कागदपत्रे वाहून गेली” अशी खोटी कथा रचली आणि मुलीचे वय २० वर्षे असल्याचे खोटे सांगितले. परंतु वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांना संशय आल्यामुळे त्यांनी नागपूरच्या अजनी पोलिसांकडे ‘एमएनसी’ पाठवली. अजनी पोलिसांनी तात्काळ ‘झिरो एफआयआर’ नोंदवत हे संवेदनशील प्रकरण पुढील तपासासाठी चंद्रपूर पोलिसांकडे वर्ग केले.

तपासाची सूत्रे रामनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे यांच्याकडे येताच त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचे सविस्तर बयान घेतले. यावेळी त्यांना हे प्रकरण केवळ अत्याचाराचे नसून यामागे काहीतरी मोठे रॅकेट असल्याचा संशय आला. त्यांनी पीडित मुलीच्या आईला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली, ज्याने पोलिसांचेही डोके चक्रावून गेले. या कसाई मातेने यापूर्वी स्वतःचीच दोन मुले तेलंगणा आणि स्थानिक पातळीवर प्रत्येकी दोन लाख रुपयांना विकली होती. इतकेच नव्हे तर आपल्या अल्पवयीन मुलीच्या पोटी जन्माला आलेल्या या नवजात बाळाचीही ती अशाच प्रकारे लाखो रुपयांमध्ये विक्री करणार होती.

पोलिसांनी मानवी तस्करीचे कलम जोडून तपास चक्र गतीने फिरवले आणि बाळाची खरेदी करणाऱ्या एका महिलेला थेट तेलंगणा राज्यातील कागजनगर येथून तर दुसऱ्या महिला दलालाला चंद्रपूर येथून अटक केली. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, एसडीपीओ प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात रामनगरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे यांनी केली असून पोलीस फरार मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.

“हे प्रकरण केवळ एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारापुरते मर्यादित नसून, यामागे नवजात बालकांची खरेदी-विक्री करणारी एक मोठी संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे.”

“रुग्णालय प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी कागदपत्रेपुराव्यांची खोटी कथा रचली होती, परंतु वैद्यकीय सतर्कतेमुळे या अमानुष कृत्याचा पर्दाफाश करणे शक्य झाले.”

Leave a Comment