नागभीड – नागभीड वृद्ध महिला फसवणूक प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, एका अज्ञात मोटरसायकलस्वाराने ७० वर्षीय महिलेचे दागिने आणि रोख लंपास केले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, एकूण ४३ हजार रुपयांचा ऐवज गेला आहे. घटना ९ नोव्हेंबर रोजी गोवारपेठ गावाजवळील जंगलातील रस्त्यावर घडली. महिला रेशन घेऊन एकारा बुंज येथून परतत होत्या. बसथांब्यावर भेटलेल्या मोटरसायकलस्वाराने त्यांना लिफ्ट दिली. नंतर त्याने हातचलाखी करून दागिने काढून घेतले, असा आरोप आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) नुसार गुन्हा नोंदवला आहे. (फटाके फोडण्याचा विरोध, कुटुंबाला मारहाण, वाचा बातमी)
नागभीड वृद्ध महिला फसवणूक प्रकरणात नेमके काय घडले?
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका गुन्ह्याबाबतची धक्कादायक बातमी समोर आली आहे. राशन आणण्यासाठी गेलेल्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची हातचलाखीने दिशाभूल करून अज्ञाताने तिच्या अंगातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४३ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिेतेच्या कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अनिल वेलहर डोंगरवार अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंजना गोविंदा बोबाटे (वय ७०, रा. एकारा बुंज, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे फसवणूक झालेल्या वृद्ध महिलेचे नाव असून त्या नागभीड तालुक्यातील बाम्हणी येथील त्यांच्या विनायक घ्यार या नातवाकडे दिवाळी सणानिमित्त आल्या होत्या. दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी एकारा बुंज येथील अमोल डोंगरवार याने नातवाच्या मोबाईलवर संपर्क साधून तुमचा राशन आला असून तो घेण्यासाठी उद्या येण्यास सांगितले. त्यानुसार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता अंजना या नागभीड येथून बसने एकारा बुंज येथे राशन आणण्यासाठी गेल्या. राशन घेतल्यानंतर दुपारी ११ वाजताच्या सुमारास त्या नागभीड येथे परत जाण्यासाठी एकारा येथील बसथांब्यावर उभ्या असताना एक मोटरसायकलस्वार तिथे आला. त्यांनी नागभीडला जायचे असल्याचे सांगितल्यावर त्या चालकाने ‘मीही तिकडेच चाललो आहे’ असे म्हणून त्यांना आपल्या मोटरसायकलवर बसवून घेतले.
प्रवासादरम्यान, आरोपीने एकारावरून मेंडकी-बाळापूर मार्गे राजोली बोंड मार्गाने येत असताना गोवारपेठ गावाजवळील जंगलातील कच्च्या रस्त्यावर वाहन थांबवले. मला संडासला जायचे आहे असे सांगून त्याने जंगलाच्या रस्त, येथे लुटारू लोक फिरत असतात, त्यामुळे तुझ्या गळ्यातील पोत तुझ्या जवळील गव्हाच्या चुंगडीत टाकून ठेव, अशी भीती दाखवली. फिर्यादी महिला सोन्याची चैन व मंगळसूत्र गव्हाच्या चुंगडीत ठेवत असताना, आरोपीने ‘थांब, मी ठेवतो माझ्याकडे दे’ असे म्हणून त्यांच्याकडील पिशवी घेतली आणि स्वतःच गव्हाच्या चुंगडीत ठेवून संडासला जातो असे सांगून निघून गेला. मात्र, बराच वेळ होऊनही तो परत आला नाही. महिलेने पिशवी व गव्हाची चुंगडी तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे तिच्या निदर्शनास आले.
अज्ञाताने विश्वासात घेऊन १ ग्रॅम वजनाची सोन्याची गरसोरी (किंमत ३,००० रुपये), १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत ३०,००० रुपये), ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ९,००० रुपये) आणि पिशवीतील १,००० रुपयांची रोकड असा एकूण ४३,००० रुपयांचा मुद्देमाल बळकावून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात १० नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







