भद्रावती – चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती रेती तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कारवाई केली. विनापास रेतीची वाहतूक करणारा टाटा हाफटन टिप्पर पोलिसांनी पकडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत टिप्परसह २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक तथा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (चंद्रपुरात आढळले मानवी शीर, धड दुसऱ्या जागी, पोलिसांचा तपास सुरु, वाचा बातमी)
भद्रावती हद्दीत नाकाबंदी, भद्रावती रेती तस्करी
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आणखी एक कठोर कारवाई केली आहे. भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनिय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी विनापास रेतीची वाहतूक करणारा एक टाटा हाफटन टिप्पर पकडला. या कारवाईत २० लाख रुपयांच्या टिप्परसह एकूण २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाहनचालक तथा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाला भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या राजुरा उपविभाग पथकाने तातडीने सूत्रे हलवत भद्रावती हद्दीत धडक नाकाबंदी केली. दरम्यान, एका संशयित टाटा हाफटन टिप्परला (क्र. MH 34 BZ 9750) रोखून पोलिसांनी त्याची झडती घेतली. वाहनाची पाहणी केली असता, त्यात कोणतीही कायदेशीर परवानगी किंवा रॉयल्टी पास नसताना २ ब्रास अवैध रेतीची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत १० हजार रुपये किमतीची २ ब्रास रेती आणि २० लाख रुपये किमतीचा टाटा हाफटन टिप्पर असा एकूण २० लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी टिप्परचा चालक तथा मालक ऋषिकेश बंडू गोरे (वय २९, रा. खापरी वॉर्ड, शारदा माता मंदिर, भद्रावती, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अवैध रेती तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या धडक कारवाईमुळे रेती माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






