चंद्रपूर एफडीए कारवाईदरम्यान खाद्य आस्थापनातील स्वयंपाकघराची तपासणी

एकाच तंदूरमध्ये शाकाहारी-मांसाहारी पदार्थ; चंद्रपुरातील चार खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 21, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर एफडीए कारवाईत अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने चार खाद्य आस्थापनांचे परवाने व नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यातील एकूण १५ आस्थापनांवर कारवाई झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत स्वयंपाकघरातील गंभीर त्रुटी उघड झाल्या. सहायक आयुक्त प्र. अ. उमप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (बँक खात्याचा गैरवापर, चंद्रपुरात एकावर गुन्हा दाखल, वाचा बातमी)

चार खाद्य आस्थापनांवर चंद्रपूर एफडीएची कारवाई,

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर पाऊल उचलले आहे. स्वयंपाकघरातील प्रचंड अस्वच्छता, अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेतील हलगर्जीपणा आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील चार प्रतिष्ठित खाद्य आस्थापनांचे परवाने व नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १५ आस्थापनांवर अशी कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ही हॉटेल्स आणि आस्थापने गेल्या अनेक वर्षांपासून शहरात व जिल्ह्यात सुरू असताना इतक्या वर्षांनंतर प्रशासनाला त्यांच्या स्वयंपाकघरातील दुरवस्था दिसून आली आहे. प्रशासनाने जर नियमित आणि काटेकोर तपासणी केली, तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होण्याची अशी गंभीर समस्याच उद्भवणार नाही, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगली आहे.

या आठवड्यात ज्या चार आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, त्यामध्ये तुकूम येथील ‘सुलतान इफहाम बिर्याणी सेंटर’, आझाद गार्डनसमोरील ‘मौचक फॅमिली रेस्टॉरंट’, भद्रावती तालुक्यातील मामवेळी येथील ‘वाईल्डलाईफ टूर्स एलएलपी (रिसॉर्ट)’ आणि मूल रोडवरील ‘श्रीहरी नाश्ता सेंटर’ यांचा समावेश आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान या सर्व ठिकाणी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

तपासणीत असे आढळून आले की, अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ तयार केले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी अन्न शिजवण्यासाठी एकाच तंदूरचा वापर केला जात होता, ज्यामुळे अन्नपदार्थ परस्परांमुळे दूषित होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. स्वयंपाकघरातील रेफ्रिजरेटर पूर्णपणे गंजलेले होते, तर चिमणी आणि गॅस बर्नरवर तेल व चिकटपणाचा जाड थर साचला होता. स्वयंपाकघरात अन्न तयार करण्यासाठी आणि भांडी धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती. अन्न हाताळणारे कर्मचारी अ‍ॅप्रन आणि डोक्यावर सुरक्षा टोपी न घालताच काम करत होते. भांडी अस्वच्छ होती आणि त्यांचे योग्य निर्जंतुकीकरण केले जात नव्हते.

तसेच, स्वयंपाकघराच्या भिंतींवर तेलाचे डाग आणि जमिनीवर कचरा व अन्नाचे अवशेष साचलेले आढळले. याशिवाय कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय योग्यता प्रमाणपत्र, अन्नपदार्थांचे तपासणी अहवाल आणि पॅकेजिंग साहित्याचे ‘फूड ग्रेड’ प्रमाणपत्रही उपलब्ध नव्हते. कीटक नियंत्रणाची आवश्यक प्रक्रियाही राबवण्यात आली नव्हती. या गंभीर त्रुटींची दखल घेत प्रशासनाने चारही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित केले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्र. अ. उमप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी कुणाल मुळे, उमेश कापगते आणि प्रणय कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

दरम्यान, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा भेसळीबाबत संशय आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार करताना तक्रारदाराने स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि संशयास्पद अन्नपदार्थाची माहिती देणे आवश्यक आहे. खाद्य व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि नियम व विनियम २०११ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार असून, त्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही कृत्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment