बिलाल कॉलनीतील चंद्रपूर गॅस सिलिंडर स्फोटाचे प्रातिनिधिक दृश्य

चंद्रपुरातील गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्न; दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 21, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर गॅस सिलिंडर स्फोटात बिलाल कॉलनी परिसरातील दोन गॅस डिलिव्हरी बॉय गंभीर भाजले आहेत. त्यांच्या खोलीत व्यावसायिक आणि घरगुती वापराचे एकूण २९ सिलिंडर आढळले. पोलिसांनी पिंटू बिश्नोई आणि रामनिवास बोला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, निवासी भागात एवढे सिलिंडर कसे ठेवण्यात आले, यावरून गॅस एजन्सी आणि पुरवठा विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. (पालकमंत्री हटाओ, चंद्रपूर बचाओ, स्वाक्षरी अभियान, वाचा बातमी)

चंद्रपूर गॅस सिलिंडर स्फोट, दोघे होरपळले

शहरातील बिलाल कॉलनी परिसरात भरवस्तीत एका बांधकाम सुरू असलेल्या घराच्या तळमजल्यावरील खोलीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटात दोन गॅस डिलिव्हरी बॉय ७० ते ८० टक्के भाजून गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या खोलीतून व्यावसायिक व घरगुती वापराचे तब्बल २९ सिलिंडर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी दोन्ही डिलिव्हरी बॉयविरुद्ध निष्काळजीपणा व जीव धोक्यात घालल्याचा गुन्हा दाखल केला असला, तरी दुसरीकडे गॅस सिलिंडरचा हा साठा निवासी भागात कसा पोहोचला, संबंधित गॅस एजन्सीवर काय कारवाई होणार आणि जिल्हा पुरवठा विभाग काय करतोय, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. (चंद्रपूर गॅस सिलिंडर स्फोट)

खोलीत व्यावसायिक आणि घरगुती वापराचे २९ सिलिंडर, चंद्रपूर गॅस सिलिंडर स्फोट

प्राप्त माहितीनुसार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेअकरा ते २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बिलाल कॉलनीतील मसिहा लॉनजवळ (विठ्ठल मंदिर वॉर्ड) गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची माहिती डायल ११२ वरून मार्शल ड्युटीवरील पोलीस हवालदार दीपक गुरनुले यांना मिळाली. मडावी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली असता अग्निशमन दलाचे वाहन आग विझवण्याचे काम करत असल्याचे दिसून आले. बांधकाम सुरू असलेल्या घराच्या तळमजल्यावरील खोलीत राहणारे पिंटू ओमप्रकाश बिश्नोई (सारण, वय २२, मूळ रा. नौखरा, ता. आऊ, जि. जोधपूर, राजस्थान) आणि रामनिवास बोला (वय २६, मूळ रा. डाबडी, ता. लोहावट, जि. जोधपूर, राजस्थान) हे दोघे गंभीर भाजलेल्या अवस्थेत आढळून आले.

दोन्ही जखमींना तात्काळ चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पिंटू बिश्नोई हा ७० ते ८० टक्के आणि रामनिवास बोला हा ८० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. ते जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या ओळखीच्या मोनिश खान (रा. दादमल वॉर्ड, चंद्रपूर) यांच्या संमतीने पुढील उपचारासाठी दोघांना नागपूर येथे हलवले.

आग विझल्यानंतर पोलिसांनी खोलीची पाहणी केली असता, तिथे इंडेन कंपनीचे व्यावसायिक वापराचे १६ सिलिंडर (त्यापैकी १० भरलेले) आणि घरगुती वापराचे १३ रिकामे सिलिंडर असे एकूण २९ सिलिंडर आढळून आले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे सर्व सिलिंडर पिकअप वाहनातून पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आले. (चंद्रपूर गॅस सिलिंडर स्फोट)

चंद्रपूर गॅस सिलिंडर स्फोट, गॅस एजन्सी आणि पुरवठा विभागाच्या भूमिकेवर प्रश्न

परिसरातील नागरिक आणि जखमींचा मित्र कमलेश गोधारा याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही मित्रनगर, चंद्रपूर येथील ‘चेतक गॅस एजन्सी’मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. दिवसभरात सिलिंडर वाटप केल्यानंतर उरलेले भरलेले व रिकामे सिलिंडर एजन्सी किंवा गोदामात सुरक्षित जमा करणे आवश्यक असताना, त्यांनी ते स्वतःच्या खोलीत ठेवले आणि त्यातूनच हा स्फोट होऊन दोघेही भाजून जखमी झाले. याप्रकरणी ग्रेड पोउपनि अशोक मडावी यांच्या लेखी तक्रारीवरून २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.३६ वाजता चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात पिंटू बिश्नोई आणि रामनिवास बोला यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२५, १२५(अ), १२५(ब) आणि २८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपती तुकाराम वाढई करीत आहेत.

चंद्रपूर गॅस सिलिंडर स्फोट, पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, या घटनेमुळे शहरातील गॅस वितरण आणि अवैध रिफलिंगच्या प्रकारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. चंद्रपूर शहरात यापूर्वी गॅस सिलिंडरच्या अवैध रिफलिंगचा घोळ आम आदमी पक्षाने उघडकीस आणला होता; मात्र त्यानंतरही जिल्हा पुरवठा विभागाने कठोर पावले उचलली नसल्याची भावना व्यक्त होत आहे. दिवसभराचे वाटप संपल्यानंतर रिकामे व भरलेले सिलिंडर एजन्सी किंवा अधिकृत गोदामात न जाता थेट निवासी भागातील खोल्यांमध्ये कसे जात होते, याबाबत पुरवठा विभाग गंभीर नव्हता असेच चित्र दिसून येते.

चंद्रपूर जिल्ह्यात अशा अनेक ठिकाणी अवैध गॅस रिफलिंगचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा असून, पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत गुन्हा दाखल केला असला, तरी या प्रकरणी संबंधित गॅस एजन्सीवर पुरवठा विभागाने कोणती कारवाई केली, हा मोठा प्रश्न आहे. दररोजचा स्टॉक, रिकामे व भरलेले सिलिंडर कुठेही नेण्याची परवानगी आहे का आणि याबाबत डिलिव्हरी करणाऱ्या गॅस एजन्सी कोणतीच विचारणा कशी काय करत नाहीत, हे अत्यंत संदेहास्पद ठरत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “चंद्रपुरातील गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्न; दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल”

Leave a Comment