ब्रह्मपुरी खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेले ब्रह्मपुरी पोलीस ठाणे

२५० नागरिकांची कागदपत्रे ताब्यात घेऊन दोन लाखांची खंडणी; ब्रह्मपुरीत खळबळ

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 25, 2026

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी खंडणी प्रकरणात लेबर कार्ड व शासकीय योजनांसाठी जमा केलेली सुमारे २५० नागरिकांची कागदपत्रे ताब्यात घेऊन दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार ब्रह्मपुरी शहरात उघडकीस आला आहे. तक्रारदाराला कार्यालयात डांबून ठेवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीनुसार हा प्रकार ३१ ऑक्टोबर रोजी घडला होता. तक्रार २४ नोव्हेंबर रोजी देण्यात आली. (ब्रह्मपुरी खंडणी प्रकरण)

लेबर कार्ड आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली जमा केलेली सुमारे २५० नागरिकांची कागदपत्रे बळजबरीने घेऊन, कार्यालयात डांबून ठेवत दोन लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा आणि न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार ब्रह्मपुरी शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उध्वस्त, वाचा)

ब्रह्मपुरी खंडणी प्रकरण: कार्यालयात काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार दिलेश महेंद्र चिमनकर (वय ३२, मूळ रा. दिघोरी मोठी, ता. लाखांदूर, जि. भंडारा; सध्या रा. पिंपळगाव, ता. ब्रह्मपुरी) हे गेल्या वर्षभरापासून ‘शौर्या असंघटित कामगार संघटना’ या संस्थेत ऑफिस बॉय म्हणून कार्यरत आहेत. शैलेश कांबळे यांच्या व्यवस्थापनाखाली चालणाऱ्या या संघटनेचे आनंदनगर, ब्रह्मपुरी येथील कार्यालय सहा-सात महिन्यांपासून बंद होते, मात्र २९ ऑक्टोबर २०२६ पासून ते पुन्हा सुरू करण्यात आले होते. या कार्यालयातून कामगारांचे लेबर कार्ड तयार करणे तसेच विविध शासकीय योजनांचे अर्ज भरून लाभ मिळवून देण्याचे काम सुरू होते आणि त्यासाठी नागरिकांकडून आधारकार्ड व राशनकार्डच्या प्रती स्वीकारल्या जात होत्या.

याच दरम्यान ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दिलेश चिमनकर हे मित्र जगदीश शेबे याच्यासोबत कार्यालयात आले. साडेदहाच्या सुमारास सहकारी तृप्ती जांभूळकर कामावर आल्यानंतर चिमनकर व शेबे बाहेर गेले. मात्र दुपारी दीड वाजता तृप्ती यांनी फोन करून कार्यालयात काही लोक आल्याचे व तातडीने येण्यास सांगितल्यानंतर दोघेही माघारी फिरले. त्यावेळी कार्यालयात आरोपी मायासिंग बावरी (रा. चोरटी, ता. ब्रह्मपुरी) आणि रमेश सोनटक्के (रा. ब्रह्मपुरी) हे उपस्थित होते. बावरी याने स्वतःचे ओळखपत्र दाखवत आपण मानवी हक्क संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले आणि लेबर कार्डसाठी आलेल्या महिलांना कागदपत्रे न देण्याची तंबी दिली. तसेच कोणाच्या परवानगीने काम सुरू केले, असा जाब विचारत दोघांनी चिमनकर यांना धमकावले आणि त्यांच्याकडील सुमारे २५० लोकांच्या आधारकार्ड व राशनकार्डच्या प्रती ताब्यात घेतल्या.

लेबर कार्ड कागदपत्रे ताब्यात घेऊन डांबून ठेवल्याचा आरोप, ब्रह्मपुरी खंडणी प्रकरण

त्यानंतर मायासिंग बावरी याने चिमनकर यांना जबरदस्तीने आपल्या वाहनावर बसवून देलनवाडी परिसरातील नागभीड रोडवरील कार्यालयात नेले आणि जगदीश शेबे यालाही तेथे बोलावून घेतले. तेथील एका खोलीत डांबून ठेवत दोघांनी चिमनकर यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय काम सुरू ठेवल्यास व्यवस्थापक शैलेश कांबळे यांच्यासह तुलाही संपवून टाकू, अशी धमकी देत दोघांचे मोबाईल काढून घेण्यात आले. काही वेळानंतर तेथे आलेला तिसरा आरोपी कुलदीप कुलसंगे यानेही मानवी हक्क संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत दोन लाख रुपये न दिल्यास कोणालाही जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली. त्याने शैलेश कांबळे यांनाही फोन करून तात्काळ पैसे घेऊन येण्यास सांगितले, अन्यथा चिमनकर यांना सोडणार नसल्याचे बजावले.

रात्री सुमारे दहा वाजेपर्यंत तिघांनी चिमनकर व शेबे यांना कार्यालयात डांबून ठेवले आणि त्यानंतर पोलिस ठाण्यासमोर असलेल्या मंदिराजवळ आणून त्यांचे मोबाईल परत केले. दुसऱ्या दिवशी दोन लाख रुपयांची तडजोड करून पैसे पोहोचवल्यानंतरच कागदपत्रे घेऊन जाण्यास सांगत, या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवंत न सोडण्याची धमकी देत त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता खिस्तानंद चौकात मायासिंग बावरी आणि कुलदीप कुलसंगे पुन्हा भेटले; मात्र पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी कागदपत्रे परत देण्यास नकार दिला. तेव्हापासून आजतागायत कागदपत्रे न देता दोन लाखांची मागणी आणि जिवे मारण्याच्या धमक्या सुरूच असल्यामुळे, सुरुवातीला भीतीपोटी तक्रार दिली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अखेर २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेश चिमनकर यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून ब्रह्मपुरी पोलिसांनी मायासिंग बावरी, रमेश सोनटक्के आणि कुलदीप कुलसंगे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज दादाराव खडसे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “२५० नागरिकांची कागदपत्रे ताब्यात घेऊन दोन लाखांची खंडणी; ब्रह्मपुरीत खळबळ”

Leave a Comment