चंद्रपूर अमृत योजना संदर्भातील विकासकामांच्या मुद्द्यावर महानगरपालिका सभेत चर्चा.

चंद्रपुरात ८४२ कोटींच्या विकासकामांचा बोजवारा? मुदत संपली, कामे अपूर्ण!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 27, 2026

चंद्रपूर (दि. २७ नोव्हेंबर २०२६) : चंद्रपूर अमृत योजना अंतर्गत सुरू असलेल्या तीन विकासकामांतील कथित अनियमिततेचा मुद्दा महानगरपालिकेच्या सभेत उपस्थित करण्यात आला. नगरसेवक पप्पू देशमुख यांनी कामांची मुदत संपूनही आवश्यक मंजुरीशिवाय कामे सुरू असल्याचा आरोप केला. संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन महापौर संगीता खांडेकर यांनी दिले. (चंद्रपुरात शिंदेसेनेला अनेक कार्यकर्त्यांनी केला शेवटचा जय महाराष्ट्र, वाचा बातमी)

चंद्रपूर अमृत योजना अंतर्गत तीन कामांची सद्यस्थिती काय?

महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक पप्पू देशमुख यांनी अमृत २.० अभियानांतर्गत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तीन महत्त्वपूर्ण विकासकामांतील अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. कामांची मुदत संपूनही आवश्यक मुदतवाढीची मंजुरी न घेता कामे सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदार व जबाबदार मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन महापौर संगीता खांडेकर यांनी सभागृहात दिले.

केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत चंद्रपूर शहरात ३० कोटी रुपयांचे रामाळा तलाव पुनर्जीवन, २७०.१३ कोटींची पाणीपुरवठा योजना आणि ५४२.०५ कोटींची मलनिस्सारण योजना सुरू आहे. या तिन्ही कामांची निर्धारित मुदत संपली असूनही कामे अपूर्ण आहेत. कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आजच्या सभेत चर्चेसाठी आला असता देशमुख यांनी कामांच्या प्रगतीची आकडेवारी मांडत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

योजनानिहाय सद्यस्थिती : चंद्रपूर अमृत योजना

१. रामाळा तलाव पुनर्जीवन : कंत्राटदार रोहित भोंगळे यांना १९ ऑगस्ट २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला होता. दीड वर्षांची मुदत १८ फेब्रुवारी २०२६ रोजी संपली. मात्र, निर्धारित मुदतीत केवळ ५० टक्के काम पूर्ण झाले.

२. अमृत पाणीपुरवठा योजना : मेसर्स लक्ष्मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि., कोल्हापूर यांना २१ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला होता. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुदत संपली असून केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले.

३. मलनिस्सारण योजना : मेसर्स ईगल इन्फ्रा इंडिया लि., उल्हासनगर यांना ११ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला होता. १० मार्च २०२६ रोजी मुदत संपेपर्यंत केवळ ३० टक्के काम पूर्ण झाले.

नियमानुसार मुदतवाढीसाठी आवश्यक प्रशासकीय व शासनस्तरीय मंजुरी घेणे अपेक्षित असताना, कोणतीही अंतिम मंजुरी नसतानाही संबंधित कामे सुरू ठेवण्यात आल्याचा मुद्दा देशमुख यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदारांना अभय मिळत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदार कंत्राटदार व मनपा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment