चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित अमृत योजना-२ मध्ये मोठ्या प्रमाणावर (Chandrapur Amrut Yojana Fraud) अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला याबाबत एक सविस्तर निवेदन सादर केले आहे. या योजनेचे काम करणाऱ्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीने वर्क ऑर्डरनुसार काम न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा थेट आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. (जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात पोलीस तक्रारपेटी ठेवा – भाजप महिला मोर्चाची मागणी)
चंद्रपूर शहरातील अमृत योजना-२ अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला सविस्तर निवेदन सादर केले आहे. या प्रकरणात संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
Chandrapur Amrut Yojana Fraud : कोट्यवधींच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप
६ जुलै २०२६ रोजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विविध पक्षांचे गटनेते तसेच नगरसेवकांना दिलेल्या निवेदनात अमृत योजना-२ चे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत सुरू असून, वर्क ऑर्डरनुसार काम न करता अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत यापूर्वीही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगरविकास विभागाचे मुख्य सचिव, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अधिकारी, मुख्य अभियंता तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, इंदिरा नगरसह विविध भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणीनंतरही संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. मनपा आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे पालनही होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
युवासेनेने निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भटकत असताना कोट्यवधी रुपयांची अमृत योजना राबवूनही अपेक्षित लाभ मिळत नाही. योजना पूर्ण होण्यास विलंब होत असून निकृष्ट कामांमुळे नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या संपूर्ण प्रकाराला संबंधित कंत्राटदार आणि देखरेख करणारे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तसेच भ्रष्टाचारामुळे शासनाचा निधी वाया जात असून संबंधित कंत्राटदारावर अद्याप कोणतीही कठोर कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयात लक्ष घालून दोषींवर तातडीने कारवाई करावी, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि अमृत योजना-२ ची उर्वरित कामे दर्जेदार व जलद गतीने पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांनी केली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






