Amrut 2 Scheme Chandrapur विरोधात चंद्रपूरमध्ये घागर फोडो मोर्चा

Amrut 2 Scheme Chandrapur । अमृत २ योजनेतील निकृष्ट कामाविरोधात महाविकास युवक आघाडीचा मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 1, 2026

Amrut 2 Scheme Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात सध्या ‘अमृत २’ योजनेचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप करत महाविकास युवक आघाडीच्या वतीने १ जून रोजी मनपा प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शने करत ‘घागर फोडो’ मोर्चा काढण्यात आला. (चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वाघांचे मृतदेश आढळले, वनविभागात खळबळ)

या योजनेतील कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराबाबत युवासेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागील सहा महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री, संबंधित सचिव आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (मजिप्रा) वारंवार निवेदने देण्यात आली, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. दरम्यान, मनपा आयुक्त अकनुरी नरेश यांनी स्वतः या कामाचा स्पॉट पंचनामा केला होता. परंतु, त्यानंतरही कामाच्या दर्जात कोणतीही सुधारणा न होता काम ‘जैसे थे’ पद्धतीनेच सुरू राहिले. यामुळे मनपा आयुक्त कंत्राटदारावर अंकुश ठेवण्यास अपयशी ठरत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Amrut 2 Scheme Chandrapur वरून आंदोलन का?

मनपाच्या याच अडेलतट्टू धोरणाचा निषेध करण्यासाठी महाविकास युवक आघाडीने शिवाजी चौकातून या भव्य मोर्चाची सुरुवात केली. यावेळी शेकडो महिला हातामध्ये घागरी घेऊन पाण्यासाठी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा महानगरपालिकेत धडकल्यानंतर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी मनपा उपायुक्तांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांनी उपायुक्तांना प्रतिकात्मक स्वरूपात ‘घागर’ भेट देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

या निवेदनात, अमृत योजनेचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची मुख्य मागणी करण्यात आली. तसेच, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या मनपा अभियंत्यांवर आणि मजिप्राच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, संबंधित दोषी अधिकारी व लक्ष्मी कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून तिला काळ्या यादीत टाकावे, अशी आक्रमक मागणी करण्यात आली.

या आंदोलनात शिक्षक सेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू, युवासेना उपजिल्हाप्रमुख यशपाल उर्फ बंटी कमटम, कंत्राटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमोल मेश्राम, विवान रामटेके, प्रशांत गद्दाला, सागर गभने, महेश श्रीगिरीवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बब्बू ईसा, दिनेश मिश्रा, प्रवीण आरपेल्ली, सूरज चव्हाण, समीर खान यांच्यासह हजारो महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment