चंद्रपूर अवैध दारू कारवाईत जप्त केलेला गावठी दारू निर्मितीचा साठा.

चंद्रपुरात दोन घरांमध्ये सुरू होता दारूचा धंदा; पोलिसांचा अचानक छापा!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 28, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर अवैध दारू निर्मितीविरोधात रामनगर पोलिसांनी जलनगर येथील कंजर मोहल्ल्यात दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १,३१० लिटर सडवा, ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि निर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ३६ हजार ४०० रुपये आहे. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या या कारवाईत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

चंद्रपूर अवैध दारू अड्ड्यांवर रामनगर पोलिसांची धडक कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी रामनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, जलनगर परिसरातील कंजर मोहल्ल्यात दोन वेगवेगळ्या घरांमध्ये बेकायदेशीररीत्या गावठी दारूची विक्री सुरू आहे. तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा सडवा मोठ्या बॅरलमध्ये साठवून ठेवण्यात आला आहे. या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ माहितीची खातरजमा करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. (आरोपीच्या शोषित गडचांदूर पोलीस पोहोचली मुंबईत, आरोपीला ठोकल्या बेड्या, वाचा बातमी)

पोलिसांनी केलेल्या पहिल्या कारवाईत कंजर मोहल्ला, जलनगर वॉर्ड येथील बरखा रामप्रसाद कंजर हिच्या घराची झडती घेण्यात आली. तिच्या घरातून गावठी दारू बनविण्याच्या साहित्यासह ७१० लिटर सडवा आणि ०५ लिटर गावठी हातभट्टीची दारू असा ७२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही अंतरावर असलेल्या निलू संतोष भाट (रा. कंजर मोहल्ला, जलनगर वॉर्ड, चंद्रपूर) हिच्या घरावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून दारू बनविण्याचे साहित्य तसेच तिथे दारू विक्री करणारा आरोपी सतीश मिलन जाधव (रा. सदर, चंद्रपूर) याच्याकडून ६०० लिटर सडवा आणि २५ लिटर गावठी हातभट्टी दारू असा ६३ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (चिमुरात दीड कोटी रुपयांचा घोळ, बनावट पावत्या देत केली फसवणूक, वाचा बातमी)

दोन्ही ठिकाणांहून मिळून एकूण १,३१० लिटर सडवा, ३० लिटर गावठी हातभट्टी दारू आणि दारू निर्मितीचे साहित्य असा १ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी संबंधित महिला आणि तिच्या हस्तकांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), (फ), (ब), (क) अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पार पडली. रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे तसेच पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, बाबा नैताम, रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, ब्ल्युटी साखरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदीप गेडाम, पंकज पोंदे आणि सूरज शेडमाके यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. शहरातील अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment