चंद्रपूर : लुम्बिनी नगर हत्या प्रकरणात चंद्रपूरमधील २० वर्षीय पृथ्वी माहूरकर यांचा मृत्यू झाला. २८ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर तलवार आणि रॉडने हल्ला केल्याची माहिती आहे. रामनगर पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे. (सततची बडबड, मुलाने केली वडिलांची हत्या, वाचा सविस्तर)
शहरातील लुम्बिनी नगर परिसरात २८ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ७ ते ८ जणांच्या सशस्त्र टोळक्याने २० वर्षीय तरुणावर तलवार आणि रॉडने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पृथ्वी माहूरकर (वय २०, रा. बाबुपेठ, चंद्रपूर) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या रक्तरंजित थरारानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, रामनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
लुम्बिनी नगर हत्या प्रकरणात नेमके काय घडले?
महानगरांप्रमाणेच आता गुन्हेगारीची धार चंद्रपूरसारख्या शहरातही तीव्र होत चालली असून, टोळीयुद्ध, अवैध धंदे आणि जीवघेण्या हल्ल्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी माहूरकर हा आपल्या पाच मित्रांसोबत लुम्बिनी नगर भागात गेला होता. त्यावेळी परिसरात आधीपासूनच घात घालून दबा धरून बसलेल्या ७ ते ८ जणांच्या टोळक्याने पृथ्वी आणि त्याच्या मित्रांवर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी पृथ्वीने एका घराच्या दिशेने धाव घेत आश्रय घेण्याचा प्रयत्न केला; मात्र निर्दयी मारेकऱ्यांनी त्याला गाठले आणि त्या घराच्या अंगणातच त्याच्यावर रॉड व तलवारीने सपासप वार केले.
या भीषण हल्ल्यात पृथ्वी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच गतप्राण झाला. घटनेनंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकाराची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून घटनास्थळाची बारकाईने पाहणी व पंचनामा करण्यात आला. रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
या खळबळजनक हत्येमागे जुन्या वादाची किनार असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. ज्या ठिकाणी वादाला तोंड फुटले, त्या परिसरात अवैध दारूचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची माहिती आहे. याशिवाय हल्लेखोर हे अवैध दारू आणि गांजा तस्करीशी संबंधित व्यावसायिक असल्याची चर्चा असून, या भागात दारूसोबतच गांजाचीही बेकायदेशीर विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. अवैध धंद्यांच्या विळख्यातून उफाळणाऱ्या वादांचे रूपांतर थेट रक्तरंजित हत्याकांडात होत असल्याने, शहरातील अवैध दारू व अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






