कोठारीतील पक्ष्यांची अवैध शिकार प्रकरणात वनविभागाच्या कारवाईचे छायाचित्र.

कोठारीत पक्ष्यांची अवैध शिकार; आंध्र प्रदेशातील तिघांना अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 29, 2026

कोठारी : पक्ष्यांची अवैध शिकार कोठारी-काटवली रस्त्यालगत उघडकीस आली. वनविभागाच्या पथकाने २९ नोव्हेंबर २०२६ रोजी संशयित झोपड्यांची तपासणी केली. या कारवाईत आंध्र प्रदेशातील तीन आरोपींना अटक करण्यात आली. घटनास्थळावरून तीन पक्षी, फासे, जाळी आणि शिकार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली. (टार्गेट चुकला, चंद्रपूर शहरात २२ वर्षीय युवकाची हत्या, वाचा बातमी)

कोठारीत पक्ष्यांची अवैध शिकार उघडकीस

कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोठारी-काटवली रस्त्यालगत सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींवर वनविभागाच्या पथकाने धडक कारवाई करत पक्ष्यांची अवैध शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आंध्र प्रदेश राज्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून जिवंत व मृत पक्ष्यांसह शिकार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपींची चंद्रपूर कारागृहात रवानगी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोठारी-काटवली मार्गावरील प्रशांत राईस मिलच्या मागील मोकळ्या जागेत असलेल्या संशयित झोपड्यांची वनविभागाच्या पथकाने आज, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी अचानक तपासणी केली. झोपड्यांची झडती घेत असताना तिथे फासे आणि जाळे भरलेली एक नायलॉनची थैली आढळून आली. पथकाने ही थैली उघडून पाहणी केली असता त्यामध्ये काळा अवाक (Red-naped Ibis, शास्त्रीय नाव Pseudibis papillosa) जातीचे २ पक्षी आणि पांढऱ्या छातीची पाणकोंबडी (White-breasted Waterhen, शास्त्रीय नाव Amaurornis phoenicurus) जातीचा १ पक्षी असे एकूण ३ पक्षी आढळून आले.

तपासणीदरम्यान वनविभागाच्या पथकाने घटनास्थळावरून शिकार करण्यासाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणातील साहित्य जप्त केले. यामध्ये नायलॉन धाग्याचे १७ फासे, २ लोखंडी कोयते, १ सुरा (सतुर), नायलॉन धाग्याचे २ बंडल, फासे बनविण्याच्या २ काड्या, नायलॉन धाग्यासह टोकदार लोखंडी काड्यांचे ३ बंडल आणि २ नायलॉन जाळ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी वज्जागिरी कोंडालू (रा. गुरजला मंडल, जि. गुंटूर), जगन्नाधम श्रीनू (रा. गुरम कॉलनी, अदंकी, जि. गुंटूर) आणि दासरी नागैह (रा. गुरजला मंडल, जि. गुंटूर) या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक चौकशीत हे सर्व आरोपी आंध्र प्रदेश राज्यातील रहिवासी असून, गावोगावी तात्पुरता ठिय्या मांडून गावातील महिलांच्या केसांच्या बदल्यात भांडी विकण्याचा व्यवसाय करतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्यवसायाच्या आडून ते वन्यप्राणी व पक्ष्यांची अवैध शिकार करीत असल्याचा संशय बळावला आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना प्रथम श्रेणी न्यायालय, राजुरा येथे हजर करण्यात आले; न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक (चंद्रपूर वनवृत्त) रामानुजम, मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये आणि सहाय्यक वनसंरक्षक (वनि व वन्य, अति. कार्य.) वैभव राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन कातकर, क्षेत्र सहाय्यक ए. बी. गेडाम आणि वनरक्षक कु. यु. ए. घोळवे यांनी पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन कातकर व क्षेत्र सहाय्यक ए. बी. गेडाम करीत आहेत. दरम्यान, अवैध शिकार तसेच संशयास्पद शिकाऱ्यांच्या टोळ्यांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment