चंद्रपूर: VIDC Scam प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत पोथरानाला सिंचन प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत बनावट अनुभव प्रमाणपत्रांचा वापर झाल्याचा आरोप केला आहे. एसीबीच्या चौकशीत तीन अनुभव प्रमाणपत्रे बनावट असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित कंत्राटदाराविरुद्ध चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे 1.49 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवण्यासाठी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. हि तक्रार चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल जित्तावार यांनी दिली आहे. (शिकार करण्यासाठी आणल्या बंदुका, पोलिसांच्या जाळ्यात अडकला)
VIDC Scam मध्ये नेमकं काय घडलं?
याप्रकरणी पोलिसांनी मे. श्रीसाई बालाजी कन्स्ट्रक्शन (नालवाडी, वर्धा) या फर्मचे मालक श्री डी. श्रीकांत श्रीनिवासलू चौधरी (रा. स्वावलंबीनगर, नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी चौधरी याने स्वतःचा गैरलाभ करून घेण्याच्या व शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे एसीबीच्या उघड चौकशीत निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या “पोथरानाला प्रकल्पा”तील “चिकणी शाखा कालव्यावरील लघु कालवा क्र. १५ च्या उपलघु कालवा क्र. ३ चे बांधकाम” करण्यासाठी २००८ मध्ये निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. या कामाची मूळ निविदा किंमत १ कोटी २५ लाख ४३ हजार ३६९ रुपये इतकी होती. कंत्राटदार श्रीकांत चौधरी याने ही निविदा मिळवण्यासाठी पूर्व अर्हता प्रपत्रासोबत स्वतःच्या स्वाक्षरीने ३ पूर्व अनुभव प्रमाणपत्रे जोडली होती. या प्रमाणपत्रांच्या आधारे पात्रता निकष पूर्ण करून त्याने १ कोटी ४९ लाख १ हजार ५३९ रुपयांचे हे कंत्राट मिळवले व १२ फेब्रुवारी २००९ रोजी कामाचे कार्यारंभ आदेश (Work Order) प्राप्त केले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सिंचन प्रकल्पाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उघड चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीदरम्यान कंत्राटदाराने सादर केलेल्या तिन्ही अनुभव प्रमाणपत्रांची सत्यता तपासण्यासाठी सातारा येथील आर्फळ डावा कालवा विभाग आणि पुणे येथील निरा देवघर प्रकल्प विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. या पडताळणीत मे. श्रीसाई बालाजी कन्स्ट्रक्शनला अशा कोणत्याही कामाचे प्रमाणपत्र संबंधित कार्यालयांकडून दिले गेले नसल्याचे आणि ही तिन्ही प्रमाणपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले.
हा संपूर्ण गुन्हा २२ सप्टेंबर २००८ ते १२ फेब्रुवारी २००९ या कालावधीत चंद्रपूर येथील लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात घडला. कंत्राटदाराने ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे माहीत असतानाही ती खरी म्हणून वापरली आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली. या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात कंत्राटदार श्रीकांत चौधरी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) १८६० च्या कलम ४२० (फसवणूक), ४६५, ४६६, ४६८ (बनावटीकरण) आणि ४७१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रामनगर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र प्रभाकर उपरे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.