चंद्रपूर: Harvester Loan Fraud प्रकरणाने चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे. हार्वेस्टर मशीनसाठी कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत बनावट फायनान्स कंपनी अधिकाऱ्यांनी एका मशीन विक्रेत्याची तब्बल 4 लाख 46 हजार 250 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी बनावट लोन सॅंक्शन लेटर पाठवून विश्वास संपादन केला आणि डाऊन पेमेंटच्या नावाखाली रक्कम उकळली. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी फसवणूक आणि आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अशा प्रकारच्या कर्ज फसवणूक प्रकरणांमध्ये नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात कर्ज व गुंतवणूक फसवणुकीच्या अनेक प्रकरणांवर कारवाई झालेली आहे. (बल्लारपूर शहरातून १३ वर्षीय मुलगी बेपत्ता)
Harvester Loan Fraud कसा उघडकीस आला?
बनावट मंजुरी पत्राद्वारे जाळ्यात ओढले पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील बाबूपेठ, मराठा चौक येथे राहणारे सचिन सदाशिव चंदनबावणे हे हार्वेस्टर मशीन विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या एका ग्राहकाने दिलेल्या मोबाईल नंबरवरून त्यांची ओळख हेमंत जोशी (रा. नागपूर) याच्याशी झाली. हेमंतने स्वतःला ‘पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड, नागपूर’चा कर्मचारी असल्याचे सांगून हार्वेस्टर खरेदीसाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
चंदनबावणे यांनी त्यांचे ग्राहक नरेश बोरकर (रा. बोदरा, ब्रह्मपुरी) यांना कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने व्हॉट्सॲपवर कागदपत्रांची यादी पाठवली. त्यानंतर १२ आणि १४ मे रोजी आरोपींनी बोरकर यांच्या घरी जाऊन कर्ज कराराची औपचारिकता केली आणि बनावट कर्ज मंजुरी पत्र (लोन सँक्शन लेटर) व्हॉट्सॲपवर पाठवून चंदनबावणे यांचा विश्वास संपादन केला.
डाऊन पेमेंट घेऊन आरोपी पसार आरोपी हेमंत जोशीने १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत डाऊन पेमेंट म्हणून ४ लाख ४६ हजार २५० रुपये पुनावाला फिनकॉर्पचे जनरल मॅनेजर वृषभ इखार यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. ग्राहकाकडे तात्काळ चेक उपलब्ध नसल्याने, चंदनबावणे यांनी स्वतःच्या बँक खात्यावरून १६ मे २०२६ रोजी आरोपीने दिलेल्या वृषभ इखारच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर (क्र. २०२८०८०८१८७) आयएमपीएसद्वारे रक्कम ट्रान्सफर केली.
रक्कम मिळाल्यानंतर आरोपीने १८ मे रोजी लोनची संपूर्ण रक्कम खात्यात जमा होईल असे आश्वासन दिले आणि मशीनची डिलिव्हरी देण्यास सांगितले. मात्र, दोन दिवस उलटूनही पैसे जमा न झाल्याने चंदनबावणे यांनी २० मे रोजी नागपूर येथील पुनावाला फिनकॉर्पच्या मुख्य कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा कंपनीत हेमंत जोशी नावाचा कोणताही कर्मचारी कार्यरत नसल्याचे आणि सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चंदनबावणे यांनी प्रथम ‘१९३०’ या सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली आणि त्यानंतर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी हेमंत जोशी (रा. सीताबर्डी, नागपूर) आणि वृषभ इखार (रा. हुडकेश्वर, नागपूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) २००० च्या कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक निशिकांत सुरेंद्र रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली या सायबर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.