चंद्रपूर: Pandharpur Padyatra निमित्त चंद्रपूरमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पायदळ पालखी वारीचे यंदाही सकल तेली समाज महासंघाच्या वतीने भव्य आयोजन करण्यात आले आहे. 12 जून 2026 रोजी चंद्रपुरातून निघणारी ही पालखी तब्बल 42 दिवसांचा प्रवास करून आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेक मान्यवर या प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (स्वतंत्र ओबीसी रकाण्यासाठी २८ जूनला चंद्रपुरात महामोर्चा)
Pandharpur Padyatra साठी चंद्रपुरात भव्य तयारी
संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या भक्तीमय परंपरेचा वारसा जपत सकल तेली समाज महासंघ चंद्रपूरच्या वतीने यावर्षीही पंढरपूर पायदळ पालखी वारी सोहळ्याचे अत्यंत भव्य नियोजन करण्यात आले असून, या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष तथा मुख्य संयोजक श्री. राजेश वारलूजी बेले यांनी आज एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, यंदाचा हा ऐतिहासिक पायदळ पालखी वारी व सत्कार सोहळा येत्या १२ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता चंद्रपूर येथे थाटात संपन्न होणार आहे.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस हे उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे लाभणार आहेत. तसेच या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी वित्त, नियोजन व वनमंत्री श्री. डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार भूषविणार आहेत. यासोबतच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी विरोधी पक्षनेते व आमदार माननीय श्री. विजयभाऊ वडेट्टीवार, पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अॅड. अभिजितजी वंजारी, चंद्रपूर शहराचे आमदार माननीय श्री. किशोरभाऊ जोरगेवार आणि विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संजय बेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राजेश बेले यांनी पत्रकार परिषदेत पुढे स्पष्ट केले की, श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ही पायदळ पालखी चंद्रपूर येथून निघून शिवपूर म्हणजेच अल्लीपूर मार्गे पंढरपूर असा तब्बल ४२ दिवसांचा प्रदीर्घ भक्तीमय प्रवास करणार आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेऊन ही पालखी पुन्हा परत फिरेल. गेल्या अनेक वर्षांपासून संताजी परिवार आणि गुरुदेव परिवारातील वारकरी ही कठीण वारी अखंडपणे काढत असून, या वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ एका समाजाचे नव्हे तर सर्व समाजातील विठ्ठल भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.
आषाढी एकादशीला विठू माऊलीच्या चरणी लीन होऊन महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुख, समृद्धी, शांती आणि उत्तम आरोग्य लाभावे यासाठी हे वारकरी मनोभावे आराधना करतात. सकल तेली समाज महासंघाच्या वतीने राजेश बेले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व धर्मीय व सर्व समाजातील नागरिकांना या भव्य पालखी प्रस्थान आणि सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आवाहन केले आहे.
आज पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण प्रेस सभेला संयोजक राजेश बेले यांच्यासह डॉ. संजय बेले, रवी लोणकर, आकाश साखरकर, सोहम बुटले, रोहन घोंगळे, दादाजी अगडे, वर्धन चवरे, रमेश खनके, गणेश यरणे तसेच महिला पदाधिकारी चंदाताई ईटनकर, कोकिळाताई पोटदुखे, मुक्ताई लोखंडे, सुनंदा येनुरकर, कविता वैरागडे, कल्पनाताई गिरडकर, योगिताताई पोटदुखे, सुवर्णाताई लोखंडे, सौ. कुमुदताई खनके, वैशालीताई गिरडकर, अनिताताई वैरागडे, अनिताताई हजारे, ज्योती येनुरकर, शुभांगी चवरे, हेमलता चवरे, विद्या चवरे आणि समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
