Ballarpur Electric Shock News MJP Contract Workers Injured

जीवन प्राधिकरणात काम करताना ३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागला विजेचा धक्का

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 12, 2026

बल्लारपूर : Ballarpur Electric Shock News मुळे बल्लारपूर शहरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ११ ऑगस्ट रोजी भीषण अपघात घडला. इलेक्ट्रिक पॅनेलचे झाकण बसवताना ३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना जोरदार शॉक लागला. या अपघातात विलास वैद्य, प्रथमेश भटारकर आणि सौरभ घवघवे जखमी झाले. विलास वैद्य यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे कर्मचारी ज्योती कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून काम करत होते. (हे हि वाचा – चंद्रपूर MIDC मधील ६७ भूखंड रद्द)

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही कर्मचारी ‘ज्योती कन्स्ट्रक्शन’ या एजन्सीच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. या ठिकाणी सुमारे ३० कंत्राटी कर्मचारी काम करत असल्याचे समजते. घटनेच्या दिवशी इलेक्ट्रिक पॅनेलचे झाकण बसवण्याचे काम सुरू असताना अचानक उच्च दाबाचा विद्युत प्रवाह उतरल्याने तिघेही त्याच्या तावडीत सापडून जखमी झाले.

१३ वर्षांपासून केवळ ११ हजार मानधन; सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह या अपघातामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची बिकट परिस्थिती आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे कर्मचारी गेल्या १३ वर्षांपासून येथे तुटपुंज्या ११ हजार रुपये मानधनावर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत त्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) कपातही केली जात नव्हती; मात्र गेल्या महिन्यापासून ही कपात सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दीर्घकाळ सेवा देऊनही अत्यल्प वेतनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या जिवाच्या सुरक्षेबाबत या घटनेनंतर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इलेक्ट्रिक पॅनेलसारखे अत्यंत धोकादायक काम करताना कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सुरक्षा साधने, तांत्रिक मार्गदर्शन आणि सुरक्षात्मक उपाययोजना पुरवण्यात आल्या होत्या की नाही, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना योग्य वैद्यकीय उपचारांसोबतच कामगार कायद्यानुसार योग्य भरपाई आणि मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच, भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस आणि कडक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment