चंद्रपूर / बल्लारपूर: बल्लारपूर पोलीस नोटीस प्रकरणावरून चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय आरोप आणि पोलिसांचे स्पष्टीकरण समोर आले आहे. १० ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील जंतर मंतरवर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होऊ नये, यासाठी दबाव आणल्याचा आरोप कॉकज जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी केला आहे. बल्लारपूर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना BNSS कलम १६८ अन्वये नोटिसा बजावल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी ही विशेष कारवाई नसल्याचे स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही नियमित प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले. (बल्लारपुरात १ हजार घरकुलाचा प्रस्ताव, वाचा हि बातमी)
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर पोलीस ठाण्यामार्फत कॉकज जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६८ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये १० ऑक्टोबरच्या आंदोलनात सहभागी न होणे, विनापरवानगी आंदोलनात सामील न होणे, हिंसाचार व भडकाऊ पोस्ट न करणे तसेच सार्वजनिक शांतता भंग न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत अध्यक्ष अभिजित दिपके यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “दिल्लीचे जंतर मंतर हे चंद्रपूर पोलिसांच्या हद्दीत येते का?” असा थेट सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत विचारला. लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पोलीस प्रशासनाचे स्पष्टीकरण:
याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दोघांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र, ही कोणतीही विशेष कारवाई नसून प्रशासकीय व सुरक्षेच्या कारणास्तव केली जाणारी नियमित प्रक्रिया (रुटीन प्रोसेस) असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






