chandrapur neet paper leak protest yuvasena signature campaign

“आम्हाला ही शिक्षण व्यवस्था बदलायची आहे!”; चंद्रपुरात युवासेनेची स्वाक्षरी मोहीम

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 25, 2026

चंद्रपूर: chandrapur neet paper leak protest चे पडसाद आता चंद्रपुरातही तीव्रतेने उमटू लागले आहेत. दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा चंद्रपुरात निषेध करण्यात आला. युवासेनेच्या वतीने जनता कॉलेज चौकात आक्रमक स्वाक्षरी मोहीम राबवून केंद्र सरकारचा तीव्र धिक्कार करण्यात आला. (हे हि वाचा – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा)

नीट पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या मोहिमेला स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

जंतर-मंतरवरील संघर्षाचे देशभरात पडसाद

नीट पेपर लीक प्रकरणानंतर कॉक्रोच जनता पक्षाने दिल्लीत युवकांना एकत्र येण्याची हाक दिली. जंतर-मंतरवरील या आंदोलनाने रौद्र रूप धारण केले. मात्र, सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी दडपशाहीचा अवलंब केला. आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जचे वृत्त पसरताच देशभरातून या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

चंद्रपुरात स्वाक्षरी मोहिमेद्वारे संताप व्यक्त

दिल्लीतील या दडपशाहीचे पडसाद चंद्रपुरातही उमटले. युवासेनेच्या वतीने शहरातील मुख्य भाग असलेल्या जनता कॉलेज चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असंख्य नागरिकांनी केंद्र सरकारविरोधातील आपला रोष स्वाक्षरी करून व्यक्त केला. “आम्हाला ही बेजार शिक्षण व्यवस्था बदलायची आहे,” असा सूर यावेळी स्वाक्षरी करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी लावला.

२० विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार: विक्रांत सहारे

यावेळी बोलताना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. “नीट पेपर लीक झाल्याने खचलेल्या देशभरातील तब्बल २० विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपविले आहे. ही अत्यंत गंभीर बाब असतानाही सरकार पेपर लीक माफियावर कडक पावले उचलत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणूनच आज देशातील युवक जागा झाला आहे,” असे सहारे म्हणाले.

शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज

विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध करताना विक्रांत सहारे म्हणाले की, “ही वर्तमान शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बदलायला हवी. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असून भविष्यात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी युवासेना सदैव प्रयत्नरत राहील.”

युवासेनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठी उपस्थिती

या स्वाक्षरी मोहिमेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे, युवती जिल्हा प्रमुख रोहिणी वैरागडे, यांच्यासह फैजल खान, मोहित टोंगे, आदित्य कन्नमवार, आदम घोंगडे, नैतिक शर्मा, श्रेयस हेडाऊ, विक्की गवाडे, अमोल दिखाडे, सोनल सोनाळकर, धम्मदीप खोब्रागडे, निखिल मोहरले, हरीश कपाटे, रितिक कुमरे, रितिक रायपुरे, अंश खोब्रागडे, अजय भसारकर, राहुल बारसगळे आदींसह मोठ्या संख्येने युवक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment