चंद्रपूर न्यायालय बॉम्ब धमकी प्रकरणी तपासणी करताना पोलीस पथक

चंद्रपूर न्यायालय बॉम्ब धमकी: ईमेलने खळबळ, दोन तास शोध

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 2, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर न्यायालय बॉम्ब धमकी प्रकरणी सोमवारी (२ नोव्हेंबर) दुपारी पोलिसांनी तातडीने तपासणी केली. जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर एका अज्ञात व्यक्तीने इमारत उडवण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी सांगितल्यानुसार, असाच ईमेल राज्यातील सात-आठ न्यायालयांना मिळाला आहे. पोलीस, श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व निकामी पथक (BDDS) तातडीने पोहोचले. न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. दोन तासांच्या शोधानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सायबर पोलीस ईमेलचा स्रोत शोधत आहेत. (वेकोलि कर्मचाऱ्याचे संतापजनक कृत्य, वाचा बातमी)

चंद्रपूर न्यायालय बॉम्ब धमकी: ईमेलमध्ये काय म्हटले होते?

चंद्रपूर जिल्हा न्यायालयाला सोमवारी दुपारी बॉम्बची धमकी मिळाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुपारी सुमारे सव्वातीन वाजताच्या सुमारास न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर एका अज्ञात व्यक्तीने स्फोटकांनी न्यायालयाची इमारत उडवून देण्याची धमकी दिली होती. हा धमकीचा ईमेल Smithjohnson या मेल आयडीवरून पाठवण्यात आला होता. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचा धमकीचा ईमेल राज्यातील अन्य सात ते आठ न्यायालयांनाही प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

धमकीचा ईमेल मिळताच न्यायालय प्रशासनाने तत्परता दाखवत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच चंद्रपूर पोलिसांची विविध पथके, श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व निकामी करणारे पथक (BDDS) ताफ्यासह दाखल होत न्यायालयाच्या आवारात पोहोचले. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि न्यायालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना इमारतीमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण न्यायालयीन इमारत आणि परिसरात कसून शोधमोहीम राबवली. वरिष्ठ पोलीस अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली न्यायालयाच्या आतील खोल्या, व्हरांडे आणि तेथे ठेवलेल्या साहित्याची बारीक-सारीक तपासणी करण्यात आली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे न्यायालय परिसरात काही काळ भीती व घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास दोन तास चाललेल्या या तीव्र शोधमोहिमेदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक पदार्थ आढळून आला नाही.

कुठलीही शंकास्पद वस्तू न मिळाल्यामुळे शेवटी सुरक्षा यंत्रणांनी व प्रशासनाने मोठा सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर न्यायालयाच्या आवारातील सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करून न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा इमारतीत प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, हा फेक ईमेल कोणी पाठवला याचा कसून शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात असून या प्रकारामुळे यंत्रणा काही वेळ सतर्क झाली होती.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “चंद्रपूर न्यायालय बॉम्ब धमकी: ईमेलने खळबळ, दोन तास शोध”

Leave a Comment