चंद्रपुरात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी मिशन २०२७ जनजागृती मेळावा

स्वतंत्र विदर्भासाठी २०२७ ची डेडलाईन; चंद्रपुरात काय घडलं?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 2, 2026

चंद्रपूर: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला चंद्रपुरात पुन्हा जोर मिळाला आहे. चंद्रपूर येथील जिजाऊ लॉनमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ‘मिशन २०२७’ जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ पोहरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी विदर्भाच्या विकासातील अनुशेष, सिंचन, शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी शहरात दुचाकी रॅलीही काढण्यात आली. (चंद्रपूर न्यायालय बॉम्बने उडवून देऊ, धमकीचा ईमेल, वाचा बातमी)

स्वतंत्र विदर्भासाठी २०२७ ची डेडलाईन

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला १२१ वर्षांचा ऐतिहासिक वारसा असून, ही मागणी आता निर्णायक टप्प्यावर नेण्याचा ठाम निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने चंद्रपूर येथील जिजाऊ लॉनमध्ये आयोजित ‘मिशन २०२७’ जनजागृती मेळाव्यात व्यक्त केला. “ना दान चाहिए, ना अनुदान चाहिए, हमे तो सिर्फ विदर्भ राज्य चाहिए” असा नारा देत ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भाची निर्मिती करण्याचा संकल्प समितीच्या नेत्यांनी केला.

नागपूर करार आणि विदर्भाच्या विकासाचा मुद्दा

माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ पोहरे यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर करार (१९५३) व १९५६ च्या घटनादुरुस्तीचे संदर्भ देत वक्त्यांनी स्पष्ट केले की, केंद्राने विदर्भाचे वैधानिक विकास मंडळ वेळेत न उभारल्याने सिंचनाचा ६० हजार कोटी रुपयांचा निधी अडकला. परिणामी १३१ धरणे अपूर्ण राहिली आणि १४ लाख हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहिली. याच दुष्काळामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात तब्बल ४७ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा नेत्यांनी केला.

विविध क्षेत्रांतील १५ हजार कोटींच्या अनुशेषामुळे विकासाला खीळ बसली आहे. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू, बेरोजगारी, तरुणांचे स्थलांतर आणि महाराष्ट्रावरील वाढता ९ लाख ३७ हजार कोटींचा कर्जाचा डोंगर पाहता, महाराष्ट्रात राहून विदर्भाचा ७५ हजार कोटींचा अनुशेष कधीही भरून निघणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि नक्षलवाद यांसारख्या गंभीर प्रश्नांवर स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय असल्याचे मत वक्त्यांनी मांडले.

मेळाव्यापूर्वी माता महाकालीचे आशीर्वाद घेऊन सुमारे पाचशे दुचाकींची रॅली शहरातून काढण्यात आली. या मेळाव्यात अरुण केदार, प्रा. मंजुषा तिरपुडे, मुकेश मासुरकर, डॉ. रमेश गजबे, ॲड. दीपक चटप, शालिक माऊलीकर यांच्यासह विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्षांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुन्ना आवळे, संचालन मितीन भागवत तर आभार प्रदर्शन सुरेश शंभरकर यांनी केले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment