Chimur Bogus Seed Case inspection by Agriculture Department Officers Chandrapur

चिमूरमध्ये बियाणे पेरले, पण उगवलेच नाही! थेट कंपनीवर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 24, 2026

चिमूर – Chimur Bogus Seed Case कारवाईअंतर्गत कृषी विभाग आणि चिमूर पोलिसांनी बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीविरुद्ध कडक पाऊल उचलले आहे. चिमूर तालुक्यातील खडसंगी शेतशिवारातील १७ शेतकऱ्यांनी ‘बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले होते. मात्र बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांचे ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. कृषी अधिकारी विलास कवडू शेंडे यांच्या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी बियाणे उत्पादक कंपनी आणि तिच्या चालकाविरुद्ध फसवणूक व बियाणे कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (बीएसएनएल टॉवर मधून दीड लाखांच्या बॅटऱ्या चोरीला)

खडसंगी परिसरातील १७ शेतकऱ्यांचे ८५ टक्क्यांपर्यंत अतोनात नुकसान

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील खडसंगी शेतशिवारासह इतर परिसरातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात ‘बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ (गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना) या कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली होती. मात्र, पेरणीनंतरही बियाणांची उगवण झालीच नाही, ज्यामुळे हवालदिल झालेल्या तब्बल १७ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी दाखल केल्या. प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेत तालुका तक्रार निवारण समितीने बाधित शेतशिवारांची प्रत्यक्ष पाहणी करून पाहणी अहवाल तयार केला. या अहवालात बोगस आणि सदोष बियाणांमुळे सर्व तक्रारदार शेतकऱ्यांच्या पिकांचे ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट निष्कर्ष समोर आले.

कृषी विभागाच्या तपासात कंपनीच्या बेकायदेशीर व दिशाभूल करणाऱ्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. संबंधित कंपनीने आपल्या बियाणे बॅगवर ‘BEST QUALITY GUARANTEED 100% SATISFACTION’ (उत्कृष्ट दर्जाची हमी आणि १००% समाधान) असा छापील दावा केला होता. बियाणे नियम १९६८ मधील नियम १० नुसार अशा प्रकारचा दावा करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे आहे. हे बियाणे ‘सत्यता दर्शक’ या प्रकारात मोडत असल्याने याच्या उत्पादन, पॅकिंग आणि सीलिंग प्रक्रियेवर कोणत्याही शासकीय प्रमाणीकरण यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो; त्यामुळे बियाणांच्या गुणवत्तेची संपूर्ण जबाबदारी उत्पादक कंपनीचीच असते. असे असतानाही निकृष्ट दर्जाचे बियाणे बाजारात आणून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे सिद्ध झाले.

या गंभीर प्रकरणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे गुण नियंत्रण कृषी अधिकारी विलास कवडू शेंडे (वय ५२) यांनी चिमूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून महाराष्ट्र शासनाच्या वतीने फिर्याद नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बियाणे उत्पादक कंपनी ‘बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि कंपनीशी संबंधित राहुल रामभाऊ पुरमे (रा. नंदनी, छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७, बीजी अधिनियम १९६६ चे कलम ६(a), ७(b), १९ व २१, बियाणे नियम १९६८ चे नियम १० व २३ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश काशिनाथ देरकर करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment