अ‍ॅट्रॉसिटी कायदा गुन्हा नोंदवणारे भिसी पोलीस ठाणे, चिमूर

शिक्षिकेला जातीवाचक शिवीगाळ चिमूर तालुक्यात पती-पत्नीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 24, 2026

चिमूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिवरा गावात शेजाऱ्यांच्या वादातून एका ३८ वर्षीय शिक्षिकेला अश्लील शेरेबाजी, जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि घराच्या टिनच्या छताची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भिसी पोलीस ठाण्यात पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून पती-पत्नीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप-अधीक्षक स्तरावरून सुरू आहे. (कुटुंबीयर एसिड फेकण्याची धमकी, तरुणी पोहोचली पोल्स ठाण्यात, वाचा)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शिक्षिका या मूळच्या नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे आपल्या नऊ वर्षीय मुलीसोबत राहतात आणि एका कॉन्व्हेंट मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवारी आपल्या आई-वडिलांकडे हिवरा गावात येत असतात. त्यांच्या आई-वडिलांच्या घराशेजारी मिनालाल परमेश्वर पिंपळकर हा आपल्या कुटुंबासह राहतो.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा गुन्हा, नेमका कशामुळे दाखल झाला?

तक्रारीतील माहितीनुसार, मिनालाल हा मद्यप्राशन करून विनाकारण फिर्यादी तसेच त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत असे आणि आई-वडील घरी नसताना अश्लील शेरेबाजी व शिवीगाळ करत असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर फिर्यादी या २१ नोव्हेंबर २०२६ रोजी हिवरा येथे आपल्या आई-वडिलांकडे आल्या होत्या. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या आपल्या आईसोबत शेतातून कापूस वेचून घरी परतल्या आणि चहा पित होत्या. त्याच दरम्यान मिनालाल पिंपळकर आणि शंकर धोटे हे दोघे मद्यधुंद अवस्थेत गाडीने घरी आले.

घरासमोरील रस्त्यावर गाडी लावून फिर्यादीला पाहताच मिनालाल याने शंकर धोटे याला उद्देशून अश्लील व आक्षेपार्ह भाष्य केले. यावर फिर्यादीने घराबाहेर येऊन जाब विचारला असता मिनालाल पिंपळकर आणि त्याची पत्नी संध्या मिनालाल पिंपळकर यांनी फिर्यादीला व त्यांचे वडील आणि आई यांच्यासोबत वाद घालत भांडण सुरू केले. वादादरम्यान मिनालाल याने हातात काडी घेऊन अंगावर धावून येत जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली तसेच फिर्यादीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली.

भांडणाच्या भरात आरोपींनी मिनालालच्या घराला लागून असलेल्या फिर्यादीच्या वडिलांच्या घरासमोरील टिनचे छत तोडून सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान केले. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शंकरपूर पोलीस चौकी गाठून लेखी तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत २४ नोव्हेंबर २०२६ रोजी भिसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी मिनालाल परमेश्वर पिंपळकर आणि संध्या मिनालाल पिंपळकर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या कलम ३(१)(r) व ३(१)(s) सह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९६, ३(५), ३२४(२), ३५१(२), ३५२ आणि ७५(१)(iv) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उप-अधीक्षक दिनकर आसाराम ठोसरे यांच्याकडे सोपवण्यात आला असून हिवरा परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment