CSTPS Chandrapur Protest memorandum submission by Shiv Sena leaders

चंद्रपुरात CSTPS च्या राख वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण; ३० दिवसांत दुरुस्ती न झाल्यास ‘बैलबंडी मोर्चा’ काढणार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 21, 2026

चंद्रपूर : CSTPS Chandrapur Protest संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाऔष्णिक वीज केंद्राच्या अवजड राख वाहतुकीमुळे रिजेक्ट कोल गेट ते आवंठा डॅम मार्गाची दुरवस्था झाली आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्थानिक २५ ते ३० शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने ३० दिवसांत दुरुस्ती न केल्यास बैलबंडी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.

३० दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याचा अल्टिमेटम

चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या (सीएसटीपीएस) रिजेक्ट कोल गेट ते आवंठा डॅम मार्गावर फ्लाय ॲश वाहून नेणाऱ्या अवजड कॅप्सूल वाहनांमुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने स्थानिक शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने येत्या ३० दिवसांत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास परिसरातील शेतकऱ्यांसह तीव्र ‘बैलबंडी मोर्चा’ काढून रास्ता रोको करण्यात येईल तसेच सीएसटीपीएसची राख वाहतूक पूर्णपणे रोखली जाईल, असा थेट व आक्रमक इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर महानगर शाखेच्या वतीने देण्यात आला आहे.

२५ ते ३० शेतकऱ्यांची शेती संकटात; अपघातांचे प्रमाण वाढले

या संदर्भात शिवसेना चंद्रपूर महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवक सुरेश आर. पचारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सीएसटीपीएसच्या मुख्य अभियंत्यांना अधिकृत निवेदन सादर केले. निवेदनानुसार, रिजेक्ट कोल गेट ते आवंठा डॅम जाणाऱ्या या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर फ्लाय ॲशच्या अवजड टँकर कॅप्सूल वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या वाहनांच्या प्रचंड वजनामुळे डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून सर्वत्र धोकादायक खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना २५ ते ३० स्थानिक शेतकऱ्यांची शेतजमीन असून त्यांना दररोज शेतात ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांचे सातत्याने अपघात होत असून शेतीकामे करताना मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

‘बैलबंडी मोर्चा’ काढून राख वाहतूक पूर्णपणे रोखणार

गेल्या तीन वर्षांपासून या गंभीर समस्येकडे सीएसटीपीएस प्रशासनाचे निवेदनांद्वारे लक्ष वेधण्यात येत आहे; मात्र प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष करत कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. राज्य शासन एकीकडे संकटात सापडलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी योजना आखत असताना, शासनाचाच घटक असलेले सीएसटीपीएस प्रशासन मात्र शेतकऱ्यांना संकटात लोटत असल्याचा आरोप करत शिवसेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने महिनाभरात रस्ता दुरुस्त केला नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून राख वाहतूक ठप्प केली जाईल, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री, चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पडोली पोलीस ठाण्याला सादर करण्यात आल्या आहेत. या वेळी शिष्टमंडळात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, शिक्षण सेनेचे राजेश नायडू, कंत्राटी कामगार सेनेचे अमोल मेश्राम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment