नागभीड: Nagbhid Crime News अंतर्गत नागभीड पोलिसांनी कानपा गावातील हनुमान टेकडी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर धडक धाड टाकली आहे. (हे हि वाचा – गोवंशाची अवैध वाहतूक, गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई)
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे. या छाप्यात ६ आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
पोलीस पथकाने घटनास्थळावरून रोकड, ६ मोबाईल आणि ५ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. एकूण ३ लाख ७७ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी कानपा येथील हनुमान मंदिर परिसरात अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त बातमी नागभीड पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच पोलीस पथकाने घटनास्थळी घेराव घालून धाड टाकली. या कारवाईत दीपक गंगाधर करुटकर (वय ३७, रा. कानपा), लक्ष्मण नेमाजी गोंगल (वय ३५, रा. पांजरेपार, ता. चिमूर), जगदिश दादाजी भुरसे (वय ४९, रा. कानपा), सुधाकर पांडुरंग मुळे (वय ४७, रा. पांजरेपार, ता. चिमूर), दामोदर वासुदेव घ्यार (वय ६६, रा. आजगाव, ता. चिमूर) आणि नितेश बाळकृष्ण मलोडे (वय ३०, रा. कानपा) या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान घटनास्थळावरून ९०० रुपयांची रोख रक्कम डावावर मिळून आली, तर आरोपींच्या अंगझडतीत ६,०१० रुपयांची रोख जप्त करण्यात आली. याशिवाय आरोपींचे ४१ हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल संच आणि ३ लाख ३० हजार रुपये मूल्याच्या ५ जुन्या वापरत्या मोटारसायकली असा एकूण ३,७७,९१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झारकर आणि नागभीडचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार, पोलीस हवालदार दिलीप चौधरी, पोलीस अंमलदार जितेंद्र मारबते आणि शुभम वनकर यांच्या पथकाने प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






