चंद्रपूर शहर आणि जिल्हा दिवसेंदिवस अवैध धंद्यांचे केंद्र बनत चालला आहे. विशेषतः युवा वर्गाला व्यसनाच्या आहारी नेण्याचे प्रकार वाढत आहेत. अशातच, चंद्रपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी पावडर (मेफेड्रोन) नावाच्या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४०,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरात एका युवकाकडून अंमली पदार्थांची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत कोहिनूर तलाव येथे सापळा रचला. काही वेळातच संशयित अमान खान (वय २४, रा. बाबूपेठ, चंद्रपूर) येथे आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय
अमान खानची झडती घेतली असता त्याच्याकडे ९.४० ग्रॅम एमडी पावडर सापडली, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे ३०,००० रुपये आहे. पोलिसांनी अधिक तपास केल्यावर अमान खानने ही पावडर आवेश शब्बीर कुरेशी (वय ३८, रा. भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) याच्याकडून घेतली असल्याची कबुली दिली. तसेच, एक पुडी विकल्यावर त्याला २०० रुपये कमिशन मिळत असल्याचे त्याने सांगितले. MD powder seizure
पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास करत बाबूपेठ येथील अमान खान आणि भंगाराम वॉर्डातील आवेश शब्बीर कुरेशी यांना अटक केली. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून एकूण ४०,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Chandrapur police action
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या संपूर्ण मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे आणि पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, संतोष कणकम, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, इम्रान खान, रुपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, सारिका गौरकार आणि दीपिका झिंगरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. Chandrapur illegal businesses
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज बैसाणे करत असून, आरोपींच्या मागील नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांचा वाढता वापर हा चिंतेचा विषय असून पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई सुरू ठेवण्याची गरज आहे. Chandrapur Crime
अंमली पदार्थांचा व्यवसाय हा शहरातील तरुणांना व्यसनाच्या दलदलीत ओढत आहे. त्यामुळे नागरिकांनीही सजग राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जर कुठे अशा अवैध व्यवसायाबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, जेणेकरून या समाजविघातक प्रवृत्तीवर आळा बसू शकेल.
Leave a Comment