किडनी विक्री प्रकरणावर प्रश्न, पालकमंत्र्यांचे लिफ्टकडे लक्ष

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur Guardian Minister : चंद्रपूर ४ जानेवारी - चंद्रपूर जिल्ह्यात भाजप पक्षात मनपा निवडणूक उमेदवारीवरून चांगलाच गोंधळ उडाला, मात्र विधानसभा निवडणुकीपासून सुरु असलेला हा गोंधळ संपायचे नाव घेत नाही आहे, विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले, सत्ता बसली आणि त्यानंतर भाजपने चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय करीत भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद नाकारले. उलट यवतमाळ जिल्ह्यातील आमदार अशोक उईके यांना मंत्रिपद देत, उईके यांची चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री पदावर वर्णी लावली. मात्र उईके हे कधी काळी चंद्रपुरात दिसतात. (भाजपात गोंधळ, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया काय?)

देशात व राज्यात अनेक बाहेरील पर्यटक येतात आणि काही दिवसांनी परत जातात तसाच दिनक्रम पालकमंत्री अशोक उईके यांचा आहे, चंद्रपूर जिल्ह्यात देशाला हादरविणारी घटना घडली, सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकावी लागली, त्याची तक्रार झाली मात्र पोलिसांनी तब्बल महिन्याभरानंतर माध्यमात बातम्या प्रकाशित झाल्यावर गुन्हा दाखल केला.

बच्चू कडू यांचा संताप

राज्याचे लक्ष या किडनी विक्री प्रकरणावर गेले, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पीडित शेतकरी रोशन कुडे ची भेट घेतली, संवेदनशील प्रकरणात जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार व खासदार यांनी तत्परता तर दाखवलीच नाही, पीडित शेतकऱ्याला भेटणे सुद्धा या जनप्रतिनिधींनी टाळले. म्हणजे सत्तेतील व विरोधी पक्षातील जनप्रतिनिधी मध्ये शेतकऱ्यांप्रती काय संवेदनशीलता आहे हे या प्रकरणावरून दिसून आले. Chandrapur Guardian Minister

पालकमंत्री अशोक उईके यांनी सदर प्रकरणात काडीमात्र लक्ष दिले नाही, ३ जानेवारीला मनपा निवडणूक नियोजन बैठकीत पालकमंत्री अशोक उईके उपस्थित राहिले, बैठक संपल्यावर ते जाण्यासाठी लिफ्टकडे गेल्यावर प्रसारमाध्यमांनी रोशन कुडे बाबत प्रश्न विचारला, मात्र पालकमंत्री यांनी प्रश्नाचे उत्तर न देता लिफ्ट कडे बघितले, दरवाजा उघडल्यावर चौकशी करून सांगतो असे उत्तर देत ते तडकाफडकी निघून गेले.

गंभीर प्रकरणाची त्यांना काही संवेनशीलता नाही असे या प्रकरणावरून दिसून येते, जिल्ह्यात काय घडतंय? काय समस्या आहे? याकडे पालकमंत्री महोदयांना काही माहिती आहे कि नाही असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. महायुती सरकारने चंद्रपूर जिल्ह्यासाठी बिनकामाचा मंत्री दिला कि काय अशी चर्चा त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये होऊ लागली आहे. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांचा मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोड शो असल्याने पालकमंत्री उईके चंद्रपुरात आले, मागील महिन्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत ते पूर्णतः गैरहजर होते.

Leave a Comment

+