शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! हमीभाव आणि खतांच्या किमतीवरून धानोरकर मोदी सरकारवर कडाडल्या

February 01, 2026 by Prakash Hande

Chandrapur MP Budget Reaction : चंद्रपूर - आज सादर झालेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा सुकाळ आणि आश्वासनांचा पाऊस आहे. प्रत्यक्षात मात्र हा अर्थसंकल्प सामान्यांच्या तोंडाला पानं पुसणारा आणि ठराविक राज्यांवर डोळा ठेवून आखलेला एक 'राजकीय अजेंडा' आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली 'पेरणी' आहे. हमीभावाचा (MSP) मुद्दा अद्याप अधांतरी आहे. खतांच्या किमती वाढल्या आहेत, पण शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्याची कोणतीही हमी या अर्थसंकल्पात दिसत नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा अर्थसंकल्प असल्याची टीका खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली. (विकसित भारताचा अर्थसंकल्प - आमदार मुनगंटीवार)

पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये निवडणुका घातल्या आहेत, म्हणूनच अर्थमंत्र्यांनी या राज्यांसाठी तिजोरीचे दरवाजे उघडल्याचे नाटक केले आहे. हा देशाचा अर्थसंकल्प नसून भाजपचा 'निवडणूक जाहीरनामा' वाटत आहे. इतर राज्यांनी काय पाप केले आहे? असा सवाल खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला.

महागाई आणि मध्यमवर्गीयांची निराशा
पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतींनी सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. या अर्थसंकल्पातून महागाई कमी करण्यासाठी कोणतीही 'रोडमॅप' दिलेली नाही. प्राप्तिकरात (Income Tax) सवलत मिळेल ही मध्यमवर्गीयांची आशा पुन्हा एकदा फोल ठरली आहे. "सरकारने केवळ आकडेवारीचा खेळ मांडला असून, सामान्यांचा खिसा रिकामाच राहणार आहे. देशातील बेरोजगारीचा दर उच्चांकी असताना, नवीन रोजगार निर्मितीसाठी कोणतीही ठोस तरतूद नाही. स्टार्टअपच्या नावाखाली तरुणांना केवळ स्वप्ने विकली जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Leave a Comment

+