२१५ जागा अन् २०,६८३ दावेदार! चंद्रपूर पोलीस भरतीचे 'ग्राउंड' तयार

February 10, 2026 by Prakash Hande

Chandrapur Police Bharti : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रिया २०२४–२५ ला दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ पासून अधिकृत सुरुवात होत आहे. पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथील कवायत मैदानावर ही प्रक्रिया पार पडणार असून, पहिल्या टप्प्यात शारीरिक मोजमाप व मैदानी चाचण्या घेतल्या जाणार आहेत. (एक मताने चंद्रपुरात इतिहास घडला)

 

या भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले असून, हजारो उमेदवार प्रत्यक्ष चाचण्यांसाठी हजर राहणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने राबविण्यासाठी RFID प्रणाली, लेझर मोजमाप तंत्रज्ञान, CCTV व व्हिडिओ रेकॉर्डिंगचा वापर करण्यात येणार आहे.

 

उमेदवारांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार, विश्रांती व्यवस्था तसेच योग्य नियोजन करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार, दबाव किंवा दलाली खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

 

तसेच उमेदवारांनी कोणत्याही अफवा, आमिष किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी न पडता स्वतःच्या गुणवत्तेच्या आधारे भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन, गैरवर्तन किंवा गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

पोलीस शिपाई पदे २१५ तर अर्ज २० हजार ६८३  

चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात एकूण २१५ पोलीस शिपाई ची पदभरती होणार आहे, यासाठी राज्यभरातून २० हजार ६८३ अर्ज आलेले आहे,  यामध्ये पुरुष उमेदवार १४ हजार ६०७, महिला उमेदवार ६ हजार ७४ व तृतीयपंथीयांच्या २ अर्ज प्राप्त झाले आहे. Chandrapur Police Bharti

 

या अधिकाऱ्यांच्या निगराणीत होणार चाचणी प्रक्रिया 

चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वाखालील होणाऱ्या चाचणी, लेखी परीक्षेसाठी १ पोलीस अधीक्षक, ४ पोलीस उपअधीक्षक, १८ पोलीस निरीक्षक, ४६ सपोनि व पोउपनि, ३३५ सहायक फौजदार, पोलीस कर्मचारी, महिला अंमलदार व पुरुष पोलीस अंमलदार, १० पोलीस कवायत निदेशक, आणि ३२ पोलीस व्हिडीओग्राफर, ६८ पोलीस अधिकारी व ३९१ पोलीस अंमलदार आणि ३७ मंत्रालयीन लिपिक वर्गीय या दरम्यान उपस्थित राहून पोलीस भरती प्रक्रिया पार पाडणार आहे.

 

उमेदवारांना राहण्याची सोय

पोलीस भरती प्रक्रियेत सामील होणारे उमेदवारांना चंद्रपुरात राहण्याची सोय नसल्यास त्यांना राहण्याकरिता पुरुष बॅरेक, पोलीस फुटबॉल ग्राउंड, तुकूम रोड चंद्रपूर येथे सोय करण्यात आली आहे, याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी पोलीस अंमलदार अजय गारघाटे मोबाईल क्रमांक ९४२०११८४९२ आणि पोलीस अंमलदार सतीश बगमारे मोबाईल क्रमांक ९३२५५०६६२० यांच्याशी संपर्क करावा.  

Leave a Comment

+