मूलजवळ पिकअपचा भीषण अपघात, 2 ठार 13 जखमी

January 21, 2026 by Prakash Hande

deadly morning accident : मूल - तेलंगणा राज्यातून धानाची रोवणी करून परतणाऱ्या मजुरांवर बुधवारी सकाळी काळाने घाला घातला. मूल तालुक्यातील नांदगाव परिसरातील लकी बारजवळ एका अनियंत्रित पिकअप वाहनाने प्रथम एका पादचाऱ्याला जोराची धडक दिली आणि त्यानंतर ते वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या अंगावर शहारे आणणाऱ्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून १३ मजूर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (कांग्रेस पक्षात घमासान, धानोरकर-वडेट्टीवार वाद टोकाला)

प्राप्त माहितीनुसार, ही घटना आज २१ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. एमएच ३४ बीजेड ३१२७ क्रमांकाचे पिकअप वाहन तेलंगणातून मजुरांना घेऊन परतत होते. नांदगावजवळून पायी चालत जात असलेले हरिदास मेटपल्लीवार (३५) यांना भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपची जोरदार धडक बसली, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्याशेजारी पलटी झाली.

या हृदयद्रावक अपघातात पिकअपमध्ये प्रवास करणाऱ्या वनिता भिकारू मरस्कोल्हे (४०, रा. डोंगरहळदी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एकूण १३ जण जखमी झाले असून, सर्व जखमींना तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. deadly morning accident

घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून वाहन जप्त केले आहे. अपघाताचा अस्वस्थ करणारा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून पोलिसांनी तपासासाठी तो ताब्यात घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, सातत्याने वाढणाऱ्या रस्ते अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Comment

+