हिट अँड रन: किरमिरी हायवेवर पिकअप चालकाने युवकाला उडवले, अपघातानंतर पळ काढला

May 11, 2026 by Prakash Hande

गोंडपिपरी - घरचे बैल विकण्याकरिता किरमिरी ते दरुर मधील बैलबाजारात जात असताना एका पिकअप वाहनाने पायदळ जाणाऱ्या ३० वर्षीय युवकाला जबर धडक दिली, या धडकेत युवकाचा मृत्यू झाला, अपघात झाल्यावर पिकअप चालक वाहन घेऊन पळून गेला. हि घटना किरमिरी - भंगाराम तळोधी हायवे रोडवर १० मे रोजी सायंकाळी ४ वाजेदरम्यान घडली.  (वळण घेताना चारचाकी थेट दुचाकीवर कोसळली, एकाचा मृत्यू)

 

किरमिरी तालुका गोंडपिपरी मध्ये राहणारे ४८ वर्षीय बाळू गोविंदा आत्राम व त्यांचा पुतण्या ३० वर्षीय गोपाल बंडू आत्राम राहणार किरमिरी हे दोघे १० मे रोजी घरचे २ बैल विकण्यासाठी बैल बाजारात पायदळ निघाले होते. ४ वाजेदरम्यान भंगाराम तळोधी हायवेजवळ बैल पुढे नेत असताना चारचाकी पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनाने भरधाव वेगात मागून गोपाल आत्राम ला जोरदार धडक दिली.

 

या धडकेत गोपाल रस्त्याच्या कडेला पडला, अपघात झाल्यावर पिकअप चालकाने वाहनासह घटनास्थळावरुन पळ काढला, १०८ वर कॉल करीत रुग्णवाहिकेची मदत मागितली, रुग्णवाहिका येताच गोपाल ला गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

याप्रकरणी बाळू आत्राम यांनी अज्ञात पिकअप वाहन चालक विरोधात गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात वाहन चालक विरोधात मोटारवाहन अधिनियम १९८८ अन्वये कलम १३४, बीएनएस कलम १०६ (१) व २८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे. 

Leave a Comment

+