वरोरा - वरोरा तहसीलच्या बेलगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न आता अत्यंत गंभीर झाला असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या महिलांचा संयम सोमवारी सुटला. अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या या महिलांनी वरोरा तहसील कार्यालयावर धडक दिली. या आंदोलनादरम्यान एका महिलेने थेट मोबाईल टॉवरवर चढून 'शोले' स्टाईलने आंदोलन केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. (दहावीत ५६ टक्के गुण, विजेचा धक्का लागला आणि जागीच अंत)
मिळालेल्या माहितीनुसार, बेलगावमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न आक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. भीषण उन्हात गावातील विहिरी आणि हातपंप आटल्याने महिलांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. वारंवार विनंती करूनही आणि स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही पाण्याची व्यवस्था होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष होता. याच संतापातून महिलांनी सोमवारी तहसील कार्यालय गाठले आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केली.
आंदोलन सुरू असतानाच, कुसुम देवानंद वैद्य नावाची महिला कोणाचेही लक्ष नसताना तहसील कार्यालयाच्या मागील भागात असलेल्या एका उंच टॉवरवर चढली. कुसुम टॉवरवर चढल्याचे लक्षात येताच उपस्थित नागरिक आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. तिने टॉवरवरून ओरडून प्रशासनाचा निषेध केला आणि जोपर्यंत गावातील पाणीटंचाईवर ठोस तोडगा निघत नाही किंवा प्रशासन लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा घेतला. या अनोख्या आंदोलनामुळे तहसील परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना समजताच पोलीस प्रशासन आणि महसूल अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टॉवरखाली जमा होऊन कुसुम यांना खाली उतरण्याची विनंती केली, परंतु संतप्त महिलेने प्रशासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास नकार दिला. गावात पिण्यासाठी पाणी नाही, लेकराबाळांचे हाल होत आहेत, अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा संतप्त सवाल यावेळी इतर आंदोलनकारी महिलांनी उपस्थित केला.
तासाभराच्या ड्राम्यानंतर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याबाबत गांभीर्याने पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती काहीशी निवळली. मात्र, बेलगावच्या महिलांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर येत्या काळात पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटली नाही, तर यापेक्षाही तीव्र आणि उग्र आंदोलन छेडले जाईल. वरोरा तहसील परिसरातील या घटनेची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत असून, मूलभूत सुविधांसाठी एका महिलेला जीव धोक्यात घालून टॉवरवर चढावे लागणे, हे प्रशासनाचे अपयश असल्याची टीका नागरिक करत आहेत. सध्या या घटनेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासन आता तरी बेलगावला दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Comment