Handbhatti raid Chandrapur: दुर्गापूर पोलिसांनी वरवट येथे हातभट्टी केली उद्ध्वस्त, 1.15 लाखांचा मुद्देमाल

May 11, 2026 by Prakash Hande

दुर्गापूर - चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौजा वरवट येथील शेत शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या छापेमारीत सुमारे १ लाख १५ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (चंद्रपुरात ११ किलो गांजा जप्त, आरोपीना अटक)

 

मिळालेल्या माहितीनुसार, वरवट येथील शेत शिवारातील झुडपी जंगलात असलेल्या नाल्यालगत धनराज धर्मदेव खोब्रागडे हा व्यक्ती मोहा फुलाची गावठी दारू काढण्यासाठी हातभट्टी लावून असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ९ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० ते ११:३० वाजेच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर दारू गाळण्याचे साहित्य आणि रसायन आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोह फुलाच्या सडव्याने भरलेले ६५० किलो वजनाचे १३ प्लास्टिक ड्रम जप्त केले, ज्याची किंमत ९७,५०० रुपये आहे. तसेच ४९ लिटर तयार गावठी दारू, लोखंडी ड्रम, टीनाचे पिपे, प्लास्टिक कॅन आणि दारू काढण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण १ लाख १५ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

याप्रकरणी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक २६०/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ब), (क), (इ), (फ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कायंदेपाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज वासाडे, पोलीस उपनिरीक्षक बिंकालवार, महिला पोलीस हवालदार राणी, पोलीस अंमलदार संदीप, मंगेश शेंडे आणि रुपेश सावे यांच्या पथकाने केली आहे. अवैध दारू निर्मितीवर पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Leave a Comment

+