चंद्रपूर : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने प्यार फाउंडेशन प्राणी बचाव केंद्र येथे मूक प्राण्यांप्रती संवेदनशीलता आणि मानवतेचा संदेश देणारा विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी प्राणी बचाव केंद्रातील विविध प्राण्यांना जवळून पाहत त्यांच्या जीवनातील संघर्ष, समस्या आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांविषयी माहिती जाणून घेतली. (चंद्रपुरातील RCERT च्या विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी)
या उपक्रमामध्ये प्रा. डी. बी. मेश्राम, प्रा. पी. एस. पाडेवार, प्रा. सी. एस. पारखी तसेच EETA बॉडी इन्चार्ज प्रा. सुयोग संघरत्न ढोके आणि प्रा. दीपाली आर. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी जखमी, आजारी आणि निराधार प्राण्यांची परिस्थिती समजून घेत त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्राण्यांना अन्न खाऊ घालत त्यांच्यासोबत वेळ व्यतीत केला. अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच अशा प्रकारच्या प्राणी बचाव केंद्राला भेट दिल्यामुळे मूक प्राण्यांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचे महत्त्व जवळून अनुभवले. विद्यार्थ्यांनी प्राण्यांप्रती प्रेम, दया आणि संवेदनशीलता जपण्याचा संदेश दिला.
प्राण्यांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर समाजाने मूक प्राण्यांप्रती अधिक जागरूक आणि संवेदनशील होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांनी “प्राण्यांवर प्रेम करा, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे” हा सामाजिक संदेश देत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रा. डी. बी. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना समाजातील प्रत्येक सजीव प्राण्यांप्रती दया, माया आणि जबाबदारीची भावना ठेवण्याचे प्रबोधन केले. समाजसेवा ही केवळ मानवापुरती मर्यादित नसून मूक प्राण्यांची सेवा देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
या सामाजिक उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे तसेच विद्युत विभाग प्रमुख डॉ. आर. के. धात्रक यांचे विशेष मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. सुयोग संघरत्न ढोके व प्रा. दीपाली आर. वैद्य यांनी विद्यार्थ्यांना समाजातील सर्व घटकांप्रती संवेदनशील राहण्याचे मार्गदर्शन केले.
मानवता, करुणा आणि सामाजिक जाणीव जोपासणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव ठरला असून विद्युत विभागाच्या या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
Leave a Comment