Gondwana University Exam Postponed : चंद्रपूर : एलएलबी तिसऱ्या वर्षाच्या चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षा तिसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षेनंतर अत्यंत कमी कालावधीत घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी होती. अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार सुधाकर अडबाले यांनी कुलगुरू यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर एलएलबीच्या तिसऱ्या व पाचव्या वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (पट्टे वाटपाची प्रक्रिया लवकर सुरु करा - आमदार जोरगेवार)
गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत एलएलबी तिसऱ्या वर्षाच्या तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा जानेवारी २०२६ मध्ये पार पडली. त्यानंतर २ फेब्रुवारी पासून कॉलेज सुरू झाले. कॉलेज सुरू होताच मूट कोड प्रॅक्टिकल दोन महिने चालले. इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली. सोबतच मार्च पासून इंटरशिप सुरू झाली. वार्षिक संमेलन, घटक चाचणी, असायमेंट हे सर्व लागोपाठ सुरू असतानाच २२ एप्रिल २०२६ पासून चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षा वेळापत्रक आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळच मिळाला नाही.
या पार्श्वभूमीवर आमदार सुधाकर अडबाले यांनी विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन गोंडवाना विद्यापीठ कुलगुरू यांच्याकडे तातडीने पाठपुरावा केला. त्यांना सर्व बाबी समजून सांगितल्या. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि परीक्षेची योग्य तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी त्यांनी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्षाच्या सेमिस्टर परीक्षा पुढे ढकलण्याची ठाम मागणी केली. Gondwana University Latest Update
आमदार सुधाकर अडबाले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून गोंडवाना विद्यापीठाने एलएलबी तिसऱ्या वर्षाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टर, पाचव्या वर्षाच्या तिसऱ्या ते दहाव्या सेमीस्टर आणि चौथ्या वर्षाच्या सेमीस्टरच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक आजच जारी करणार असल्याचे कुलगुरू यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार व्यक्त केले आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सदैव तत्पर राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a Comment