Gondpipri Wadholi Crime । चंद्रपूर हादरलं! मित्रासोबतची चर्चा ठरली शेवटची; २० वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!

April 20, 2026 by Prakash Hande

Gondpipri Wadholi Crime : गोंडपिपरी : तालुक्यातील वढोली येथे रविवारी (दि. 19) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नागमंदिर परिसरात झालेल्या वादातून एका युवकावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वैभव साईनाथ आळे (वय 20) याचा उपचारादरम्यान सोमवारी पहाटे मृत्यू झाला. (बल्लारपुरात देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त)

 


मिळालेल्या माहितीनुसार,नागमंदिर परिसरात काही युवक नेहमीप्रमाणे मैत्रीपूर्ण चर्चेसाठी बसले होते.त्यावेळी जुन्या किरकोळ कारणावरून वैभव आळे व त्याचा मित्र परिमल झाडे यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढत जाऊन मारहाणीत बदलला.त्याच दरम्यान परिमल झाडे याने वैभव आळे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.

 


हल्ल्यात वैभव गंभीर जखमी झाल्याने गावकऱ्यांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.तेथे शस्त्रक्रिये दरम्यान सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.


घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे व पीएसआय मंगेश कराडे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दरम्यान हल्ला करणारा आरोपी परिमल झाडे हा फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
मृतक वैभव आळेच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे वढोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

+