रस्त्याच्या कडेला खेळणाऱ्या ५ वर्षीय मुलीला वाहनाने उडविले

January 17, 2026 by Prakash Hande

hit and run accident : मुल (चंद्रपूर) १५ जानेवारी : मुल तालुक्यातील भवराळा येथे आज गुरुवारी सकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका टाटा एस वाहनाने रस्त्याच्या कडेला खेळणाऱ्या ५ वर्षीय चिमुकलीला चिरडले. या भीषण अपघातात बालिकेचा जागीच मृत्यू झाला असून, घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (ट्रॅक्टर अपघातात दोघांचा मृत्यू)

 

खेळता खेळता काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रिया सोमेश्वर सरपाते (५ वर्ष) असे मृत बालिकेचे नाव आहे. रुद्रप्रिया ही गुरुवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास भवराळा येथील खेडी-जुनासुर्ला मार्गावर घराशेजारी रस्त्याच्या कडेला खेळत होती. याच वेळी खेडीकडून जुनासुर्लाकडे जाणारे टाटा एस वाहन (क्र. MH 34 BG 3643) अत्यंत वेगाने आले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने निरागस रुद्रप्रियाला जोराची धडक देऊन चिरडले. hit and run accident

 

चालकाचा पळ काढण्याचा प्रयत्न

अपघात घडल्यानंतर चालक मुखरु ऋषी मेश्राम याने घटनास्थळावरून वाहन घेऊन पळ काढला. मात्र, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तत्काळ पाठलाग करून चालकाला आणि वाहनाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

ग्रामस्थांचा रास्तारोको आणि मागणी

या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून 'रास्तारोको' आंदोलन केले. या मार्गावर वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने येथे तातडीने गतिरोधक (Speed Breakers) बसवण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मागणी मान्य होईपर्यंत ग्रामस्थ आक्रमक भूमिकेत होते.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून, अपघाताची नोंद करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Leave a Comment

+