बिबट्याचा हल्ला मात्र २ दिवसांनी घडलं असं

January 18, 2026 by Prakash Hande

Leopard Attack Update : बल्लारपूर - बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज मृत्यू झाला. नितेश सुभाष शेडे (३२) असे मृत तरुणाचे नाव असून, नागपूरला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीसोबतच संतापाचे वातावरण पसरले आहे. नवीन वर्षात मानव वन्यजीव संघर्षात दोघांचा बळी गेला आहे. (बंद दुकानात दारूचा साठा, चंद्रपूर पोलिसांनी पकडली लाखोंची दारू)

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास नितेश शेडे हे गावाबाहेर गेले असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात नितेश यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या होत्या. घटनेच्या रात्री उपचार न घेता, दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या लक्षात आणून देण्यात आला.

उपचारादरम्यान ओढावला काळ

वनविभागाच्या मदतीने नितेश यांना प्रथम बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते, मात्र प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात हलवावे लागले. प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने नागपूरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु दुर्दैवाने प्रवासादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. Leopard Attack Update

प्रशासकीय मदत आणि कारवाई

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

  • तातडीची मदत: वनविभागातर्फे मृतकाच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची सानुग्रह मदत तात्काळ सुपूर्द करण्यात आली आहे.

  • पोलिस बंदोबस्त: घटनेनंतर गावात निर्माण झालेला तणाव पाहता बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले.

ग्रामस्थांच्या मागण्या

या घटनेमुळे कळमना परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने केवळ मदत देऊन न थांबता खालील उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे:

१. परिसरात तातडीने गस्त (Patrolling) वाढवावी.

२. नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा.

३. मृतकाच्या कुटुंबाला शासनाकडून मिळणारी पूर्ण नुकसानभरपाई त्वरित मिळावी.

सध्या नितेश शेडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास वनविभाग आणि पोलीस करत आहेत.

Leave a Comment

+