कबड्डी खेळायला गेलेल्या युवकाचा मृतदेह विहिरीत; हातपाय बांधून विहिरीत फेकल्याचा संशय

January 17, 2026 by Prakash Hande

Missing Youth Found Dead : जिवती १ जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात एका २२ वर्षीय युवकाच्या हातापायाला दगड बांधून त्याला विहिरीत फेकून दिले सदर बाब ३१ डिसेंबर रोजी उघडकीस आली. मृतक युवक हा २३ डिसेंबर पासून बेपत्ता होता.

तालुक्यातील लांबोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भुरीयेसापूर या छोट्याशा गावात एक अत्यंत क्रूर आणि हृदयद्रावक हत्येची घटना उघडकीस आली आहे. २२ वर्षीय गोपीनाथ भीमराव कोडापे या तरुणाला अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून किंवा इतर प्रकारे ठार मारल्यानंतर त्याच्या हातापायाला दगड बांधून गावाजवळील एका खासगी विहिरीत फेकून दिले. बुधवार (ता. ३१) सकाळी शेतकरी पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ गेला असता युवकाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. (कंबोडिया ते तामिळनाडू, किडनी रॅकेट, एक किडनी ८० लाखात, मोठा खुलासा)

गोपीनाथ हा या भागातील परिचित आणि गरीब कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. आई-वडील आणि कुटुंबीयांसाठी तो कबड्डीचा एक चांगला खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. तो २३ डिसेंबर रोजी घरून कबड्डी खेळण्यासाठी निघाला होता आणि त्यानंतर आजपर्यंत त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नव्हता. गोपीनाथच्या गळ्यात आणि हातापायांना मोठे दगड बांधलेले होते. यावरून त्याला जाणीवपूर्वक मारहाण करून किंवा ठार मारल्यानंतर विहिरीत फेकले असावे, असा संशय आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरून हा केवळ अपघात नसून, सुनियोजित हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Missing Youth Found Dead

घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ जिवती पोलिस स्टेशनला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले. जिवतीचे ठाणेदार प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. गोपीनाथच्या आई-वडिलांनी याला घातपात असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत चार तरुणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून, लवकरच गुन्हा दाखल करून अधिक तपास केला जाणार आहे. गोपीनाथच्या कुटुंबीयांनी या घटनेचा योग्य तपास करून न्याय देण्याची मागणी केली आहे. या घटनेने संपूर्ण भुरीयेसापूर आणि परिसरातील गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

+