Nagbhid News : नागभीड १३ जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाची दाहकता पुन्हा एकदा समोर आली आहे. मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी नागभीड तालुक्यातील टेकरी (इरव्हा) परिसरात वाघाने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, नवीन वर्षातील मानव-वन्यजीव संघर्षाची ही पहिलीच बळी ठरलेली घटना असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय? ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथील रहिवासी असलेले भाऊराव विठोबा राऊत (वय ४७) हे मंगळवारी दुपारी आपल्या एका सहकाऱ्यासह टेकरी येथील शेतात तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेले होते. दुपारी ४ च्या सुमारास त्यांचा सहकारी त्यांना शेतात सोडून जवळच्या बाजारात गेला होता. मात्र, सायंकाळी ६ वाजता जेव्हा तो सहकारी परतला, तेव्हा भाऊराव यांची सायकल शेताजवळ तशीच उभी होती. हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला.
शेतात आढळला मृतदेह: ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता, शेतात भाऊराव यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. प्राथमिक पाहणीत वाघाने झडप घालून त्यांचा जीव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच नागभीडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा सुरू केला.
शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेमुळे नागभीड आणि ब्रह्मपुरी सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. वन्यप्राण्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
Leave a Comment