Political Party Joining News : राजुरा २ जानेवारी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तसेच भाजप ला राजुरा विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला असून, शिवसेनेचे विधानसभा संघटक सचिन गोरे आणि भाजपचे कार्यकर्ते धनराज लांडे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात गोरे व लांडे यांना काँग्रेस पक्षाचा दुपट्टा परिधान करून औपचारिक पक्षप्रवेश दिला. (चंद्रपूर मनपा निवडणूक ५६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात)
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपाध्यक्ष धनंजय चिंचोलकर, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद झाडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष इर्शाद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गोरे यांच्यासोबत साखरी येथील धनराज लांडे, सुरेश पाडे, दादाजी आस्वले, उत्तम बोबडे, मिलन करदोडे, रवींद्र करमणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रवेशावेळी बोलताना माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी काँग्रेस ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी चळवळ असून, अनुभवी व कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. सचिन गोरे व धनराज लांडे यांनीही काँग्रेसच्या विचारधारेशी प्रेरित होऊन हा निर्णय घेतल्याचे सांगत, आगामी काळात पक्षवाढीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे राजुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संघटनात्मक बळ वाढणार असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Leave a Comment