Prem Prakaran Murder : भिसी/चिमूर : चिमूर तालुक्यातील भिसी येथील बेपत्ता तरुण बादल ज्ञानेश्वर मेश्राम (२२) याची प्रेमप्रकरणाच्या वादातून गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलातील नाल्यात पुरला होता. मात्र, चंद्रपूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावत मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. (१०० च्या सीसीटीव्ही ची तपासणी आणि आरोपीला अटक)
१७ जानेवारी २०२६ रोजी बादल मेश्राम हा उमरेड येथून आपली दुचाकी घेऊन येतो असे सांगून घरून निघाला होता, मात्र तो परतला नाही. याप्रकरणी त्याची आई सौ. गीता मेश्राम यांच्या तक्रारीवरून भिसी पोलीस ठाण्यात १९ जानेवारी रोजी मिसिंगची नोंद करण्यात आली होती.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, बादलचे मुख्य आरोपी देवानंद गोवर्धन श्रीरामे याच्याशी प्रेमप्रकरणातून वाद असल्याचे समोर आले. आरोपी देवानंदने बादलला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी आरीफ उस्मान खाँ पठाण आणि सौरभ सुभाष चौधरी या दोघांना 'मालामाल' करण्याचे आमिष दाखवून हत्येची सुपारी दिली. Prem Prakaran Murder
आरोपींनी बादलला 'मुलीवर वशीकरण करण्याची पुडी देतो' असे सांगून खडसंगी येथे बोलावले. तिथून त्याला मुरपार मिनझरी जंगल शिवारात नेले. "डोळे मिटून मुलीचे नाव घे आणि जमिनीवरचे पाच दगड उचल, तुला तुझी आवडती मुलगी मिळेल" असे सांगून त्याला जाळ्यात अडकवले. बादल डोळे मिटून दगड उचलत असतानाच, देवानंदने मागून नायलॉन दोरीने त्याचा गळा आवळला. यावेळी बादलने "दादा, मला का मारता?" अशी विनवणी केली, मात्र "तूच माझ्या जीवनातील सर्वात मोठा अडथळा आहेस" असे म्हणत आरोपींनी त्याला ठार केले.
हत्या केल्यानंतर आरोपींनी बादलचा मृतदेह जंगलातील नाल्यात खड्डा खोदून पुरून टाकला. गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी मृतकाची दुचाकी आणि मोबाईल उमरेड येथे नेऊन टाकला, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी. त्यानंतर आरोपी गावात निर्धास्तपणे वावरत होते.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा आणि भिसी पोलिसांनी तांत्रिक तपासासह उमरेड येथील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सची (CDR) कसून तपासणी केली. संशयावरून देवानंद श्रीरामे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तहसीलदार यांच्या समक्ष पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, भिसी ठाणेदार मंगेश भोंगाडे, सपोनि बलराम झाडोकर व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. सायबर सेलच्या मदतीने या गुन्ह्याचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आले.
Leave a Comment