Subhash Dhote Chandrapur : राजुरा :-- केंद्र सरकारने सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, महिला व युवकांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा असून हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ मोठ्या उद्योगपतींच्या हितासाठी तयार करण्यात आलेला जनविरोधी दस्तऐवज असल्याची तीव्र टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.
महागाई, बेरोजगारी, शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी, आरोग्य व शिक्षण या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडून ठोस उपाययोजना अपेक्षित असताना या बजेटमध्ये केवळ आकड्यांची जादू दाखवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीबाबत कोणतीही ठोस घोषणा नसून, खत, बियाणे व डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तरुणांच्या रोजगारासाठी ठोस योजना नसून, केवळ घोषणा आणि आश्वासनांची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. खासगीकरणाला चालना देत सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विक्रीस काढण्याचे धोरण म्हणजे गरिबांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठीची तरतूद अपुरी असून, ग्रामीण व आदिवासी भागांच्या विकासासाठी स्वतंत्र व प्रभावी तरतूद दिसून येत नाही. ("हा तर भाजपचा निवडणूक जाहीरनामा!" बजेटवर खासदार प्रतिभा धानोरकर यांचा घणाघाती आरोप)
करदात्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. या सरकारने मागील अर्थसंकल्पात दिलेली आश्वासने अजून पर्यंत पूर्ण केलेली नाहीत त्यामुळे नवीन घोषणा पुर्ण होईल याची शाश्वती नाही. महाराष्ट्र, विशेषतः विदर्भ (चंद्रपूर) च्या जनतेच्या अपेक्षावर पाणी फेरले आहे. या भागात शहरी व ग्रामीण विकासासाठी धोरणात्मक उपाययोजना आवश्यक असताना त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. Subhash Dhote Chandrapur
हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ भासवून कागदी विकास दाखविणे आहे. प्रत्यक्षात मात्र सर्व सामान्यांच्या पदरी निराशाच आली आहे. काँग्रेस पक्ष या जनविरोधी अर्थसंकल्पाचा तीव्र निषेध करीत असून, जनतेच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करीत राहणार अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.
Leave a Comment