Panipuri Food Poisoning incident in Samda Buj village

सावधान! पाणीपुरी खाल्ल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील १२ बालकांना विषबाधा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 25, 2026

सावली: Panipuri Food Poisoning प्रकरणामुळे सावली तालुक्यातील सामदा बुज गावात खळबळ उडाली आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर १२ बालकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. आरोग्य विभागाने तातडीने उपचार सुरू केले असून अन्न नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

तालुक्यातील सामदा बुज येथे पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल १२ लहान मुला-मुलींना अन्नातून विषबाधा (फूड पॉइझनिंग) झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २४) सायंकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, सावली तालुक्यामध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या दूषित खाद्यपदार्थांमुळे नागरिकांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या असल्याने, या निमित्ताने तालुक्यातील खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (३० जूनला चंद्रपुरात भव्य रोजगार मेळावा)

Panipuri Food Poisoning प्रकरणामुळे गावात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, व्याहाड बुज येथील पाणीपुरी विक्रेता दशरथ तुळशीराम मोटघरे हा बुधवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी चार वाजताच्या सुमारास सामदा बुज येथे पाणीपुरी विकण्यासाठी आला होता. गल्लीत पाणीपुरीची गाडी आल्याने गावातील अनेक लहान मुलांनी ती आवडीने खाल्ली. मात्र, पाणीपुरी खाल्ल्यानंतर काही वेळातच या बालकांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. एकापाठोपाठ एक १२ चिमुकल्यांची प्रकृती बिघडल्याने गावात पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि मोठी धावपळ उडाली. विषबाधा झालेल्या मुलांपैकी एका चिमुकल्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (चंद्रपूर लोकसभेच्या खासदाराचे रिपोर्ट कार्ड बघा)

घटनेचे गांभीर्य ओळखून सामदा उपकेंद्राचे आरोग्य पथक रात्रीच गावात दाखल झाले. आरोग्य विभागाच्या सीएचओ, एएनएम आणि एमपीडब्ल्यू कर्मचाऱ्यांनी बाधीत बालकांवर तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले. त्यानंतर गुरुवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या सिंग यांनी पथकासह सामदा बुज गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यातील तीन बालकांना अधिक उपचारासाठी व्याहाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असून, सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

विक्रेत्याला कारणे दाखवा नोटीस व अन्न सुरक्षा विभागाकडे धाव

या बेजबाबदारपणाची सामदा बुज ग्रामपंचायतीने कडक दखल घेतली आहे. ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संबंधित पाणीपुरी विक्रेता दशरथ मोटघरे याला थेट ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. दूषित अन्न विकून बालकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी आपल्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करू नये, याचा तातडीने खुलासा सादर करण्याचे आदेश त्याला देण्यात आले आहेत. दुसरीकडे, आरोग्य विभागाने अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाला पत्र लिहून संबंधित पाणीपुरी आणि पाण्याचे नमुने जप्त करून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मागणी केली आहे. दूषित पाणी किंवा निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळेच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment