पोंभूर्णा : pombhurna tiger attack मुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे. पोंभूर्णा तालुक्यातील जुनोना वनपरिक्षेत्रांतर्गत सातारा भोसले जंगल परिसरात वाघाच्या भीषण हल्ल्यात ५० वर्षीय गुराख्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव उसटू लहानूजी पोरेते असे आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चालू वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षातील हा २५ वा बळी ठरल्याने संपूर्ण पोंभूर्णा तालुक्यात आणि लगतच्या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. (हे हि वाचा – वाघाने जबड्यात पकडले, धाडशी गुराखी वाचला)
नेहमीप्रमाणे गावातील जनावरे चारण्यासाठी उसटू पोरेते हे नीलकंठ रामभाऊ पेंदोर यांच्यासोबत सातारा भोसले लगतच्या जंगलातील कंपार्टमेंट क्रमांक ४४१ मध्ये गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक एका पट्टेदार वाघाने त्यांच्यावर समोरून चाल केली. वाघाला पाहताच दोघेही जीवाच्या आकांताने धावले. यावेळी नीलकंठ पेंदोर यांनी तत्परता दाखवत जवळच्या एका झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, दुर्दैवाने वाघाने उसटू पोरेते यांच्यावर झडप घेतली. वाघाचा हा हल्ला इतका भीषण होता की पोरेते यांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला.
या थरारक घटनेची माहिती मिळताच वन विकास महामंडळाचे प्रकल्प सहायक व्यवस्थापक आर. एस. कदम, जुनोना वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एन. मेश्राम आणि सातारा भोसले बीटचे वनरक्षक कावरे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. मृत उसटू पोरेते यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वन विकास महामंडळाच्या वतीने अंत्यविधीच्या खर्चासाठी पोरेते यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली असून वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी हल्ला झालेल्या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प सहायक व्यवस्थापक आर. एस. कदम यांनी दिली. जंगलालगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याने वन विभागाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा आणि सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी आक्रमक मागणी आता स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






